नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुषांना कर्करोग; राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 08:45 AM2023-05-30T08:45:00+5:302023-05-30T08:45:01+5:30
Nagpur News नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.
नागपूर : नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.
३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सोमवारी पत्रपरिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग, डॉ. बी. के. शर्मा व सचिव अनिल मालवीय यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंग म्हणाले, २०२१मध्ये हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या ८०६ म्हणजेच ३५.७ टक्के रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळून आला. ३५५ म्हणजे, १७.७ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. ३.६ टक्के रुग्णांमध्ये अन्ननलिकेचा, ३.३ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा, १.२ टक्के रुग्णांमध्ये पोटाचा, ०.८ टक्के रुग्णांमध्ये अस्थिमज्जाचा आणि ०.७ टक्के रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले. केरळ, मिझोराम, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. येथे प्रति लाख लोकसंख्येमध्ये १३० पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात.
-महाराष्ट्रात २ कोटी २८ लाख लोकांना तंबाखूचे व्यसन
महाराष्ट्रात जवळपास ३१.४ टक्के लोकसंख्या म्हणजे २ कोटी २८ लाख ९९ हजार २७३ लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यापैकी ३.४ टक्के म्हणजे २८ लाख ४ हजार ३८० लोक सिगारेटचे सेवन करतात. याशिवाय २.७ टक्के म्हणजे २२ लाख २७ हजार ८ लोक विडी, तर २७.६ टक्के म्हणजे २ कोटी २७ लाख ६४ हजार ९९६ लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.
-कॅन्सरचे रुग्ण दीड ते तीन पटीने वाढले
हॉस्पिटलचे सल्लागार व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बी. के. शर्मा यांनी सांगितले, २०२२ मध्ये भारतात सुमारे १९ ते २० लाख कॅन्सरचे रुग्ण आढळून आले. सुमारे दीड ते तीन पटीने रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी तंबाखू व त्यापासून बनवलेल्या उत्पादनावर पूर्णत: बंदी आवश्यक आहे. ३१ मे रोजी सकाळी ८:३० वाजता जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त हॉस्पिटलतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.