पुणे, मुंबईपूर्वी नागपुरात ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’
By admin | Published: February 7, 2017 02:04 AM2017-02-07T02:04:28+5:302017-02-07T02:04:28+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून नागपुरातील मेडिकल येथे साकारण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’वर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.
१२० कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे : ‘एससी’, ‘एसटी’ना विशेष सवलत देण्याच्या सूचना
नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून नागपुरातील मेडिकल येथे साकारण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’वर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यात १२० कोटींच्या निधीचा प्रस्ताव तत्काळ ‘कॅबिनेट’पुढे सादर करा, अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे येत्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, पुणे, मुंबई व औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट पूर्वी नागपुरात हे इन्स्टिट्यूट रुग्ण सेवेत असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुख्य उपस्थितीत झाली. या बैठकीत ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’साठी नागपूर मेडिकलने उपलब्ध करून दिलेली चार एकरची जागा, पहिल्या टप्प्यात तळमजल्यावर रेडिओथेरपी विभाग, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या मजल्यावर सर्जरी आॅन्कोलॉजी तर तिसऱ्या टप्प्यात दुसऱ्या मजल्यावरील मेडिकल आॅन्कोलॉजी विभागावर चर्चा करण्यात आली. बैठकीत टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शर्मा उपस्थित होते. त्यांनी नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट आवश्यक असल्याचे मत मांडून उपचारासाठी आवश्यक असलेले दोन ‘लिनीयर एक्सीलेटर’ ‘कोबाल्ट’, ‘ब्रॅकीथेरपी’ व ‘सीटी सेम्युलेटर’ उपकरणांच्या खरेदीत मदत करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीन शिनगारे, सहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे व डॉ. विरल कामदार उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पुणे, मुंबईमध्ये ‘पीपीपी’स्तरावर इन्स्टिट्यूट
सूत्रानुसार, या बैठकीत सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (पीपीपी) पुणे व मुंबईमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट करण्यावरही चर्चा करण्यात आली. राज्याच्या १२० कोटींमधून औरंगाबादमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या १२० निधीतून नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कामाला सुरुवात होईल, याची शक्यताही या बैठकीत वर्तविण्यात आली.
राजकुमार बडोले यांनी केल्या विशेष सूचना
सामाजिक न्याय विभागाच्या १२० कोटीमधून हे इन्स्टिट्यूट होणार आहे. यामुळे अनुसूचित जाती (एसटी) व अनुसूचित जमातीतील (एससी) रुग्णांना या इन्स्टिट्यूटमध्ये विशेष सोई सवलती उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी केल्याचे, सूत्राने सांगितले.