कर्करोगाच्या रुग्णांवर आता विनाविलंब उपचार
By सुमेध वाघमार | Published: January 13, 2024 05:53 PM2024-01-13T17:53:17+5:302024-01-13T17:53:33+5:30
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी याची दखल घेऊन कर्करोग विभागातच जनआरोग्य योजनेची शाखा उघडली.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचे एकच कार्यालय असल्याने रुग्णांची गर्दी व्हायची. परिणामी, कर्करोगाच्या रुग्णांवर मोफत औषधोपचारासाठी प्रतीक्षेची वेळ यायची. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी याची दखल घेऊन कर्करोग विभागातच जनआरोग्य योजनेची शाखा उघडली. यामुळे आता कर्करोगाचा रुग्णांवर वनाविलंब उपचार शक्य होणार आहे.
शनिवारी या शाखेचे उद्घाटन डॉ. गजभिये यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवान उपस्थित होते. मेडिकलमधील कर्करोग विभागात वर्षाला दोन हजारांवर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्ण महात्मा ज्योतीबा फु ले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी असतात. या योजनेतून मंजुरी मिळाल्यावरच त्यांना नि:शुल्क औषधोपचार मिळतो . परंतु मेडिकलमध्ये या योजनेचे एकच कार्यालय असल्याने व त्यावर इतरही रुग्णांचा भार असल्याने अनेकदा कर्करोगाच्या रुग्णांचे प्रकरण मागे पडायचे. औषधोपचारात उशीर व्हायचा. याच्या तक्रारी वाढल्याने डॉ. गजभिये यांनी यासाठी पुढाकार घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांनी विशेष प्रयत्न करून कर्करोग विभागातच योजनेची एक शाखा उघडली. येथे केवळ कर्करोगाच्या रुग्णांच्या प्रकरणांची नोंद होणार आहे. यामुळे प्रकरणांना मंजुरी मिळून लवकर औषधोपचार मिळण्याची शक्यता आहे. या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले योजनेचे प्रमुख डॉ. संजीव मेढा व कर्करोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय मोहबिया डॉ. पौर्णिमा काळे डॉ. प्रज्ञा तिजाळे व विभागाचे डॉक्टर कर्मचारी रुग्ण उपस्थित होते.