मेडिकलमधील किमोथेरपी औषधीविना बंद; कॅन्सर रुग्णांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 01:27 PM2022-02-05T13:27:27+5:302022-02-05T13:37:06+5:30
कोरोनामुळे सलग दोन वर्षे उपचारापासून वंचित राहिलेले कॅन्सरचे रुग्ण वाढलेला आजार घेऊन मेडिकलमध्ये येत आहेत. परंतु आवश्यक सोयीअभावी रुग्णांना उपचार कसा द्यावा, या चिंतेत येथील डॉक्टर आहेत.
नागपूर : गरीब व सामान्य रुग्णांसाठी मेडिकल आशेचे किरण असले तरी येथील कॅन्सरचा रुग्ण अद्ययावत उपचारापासून वंचित आहे. आता तर औषधीविना किमोथेरपीही बंद असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. आम्ही मरावे की जगावे, असा प्रश्नच आता रुग्ण विचारू लागले आहेत.
कोरोनामुळे सलग दोन वर्षे उपचारापासून वंचित राहिलेले कॅन्सरचे रुग्ण वाढलेला आजार घेऊन मेडिकलमध्ये येत आहेत. परंतु आवश्यक सोयीअभावी रुग्णांना उपचार कसा द्यावा, या चिंतेत येथील डॉक्टर आहेत. कालबाह्य झालेले कोबाल्ट यंत्र व दोन वर्षांपासून बंद असलेले ब्रॅकेथेरपी यंत्रामुळे कसेबसे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर आता औषधांच्या प्रतीक्षेत जीवघेण्या वेदनांसह दिवस काढण्याची वेळ आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट कॅन्सरग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा नियम असताना रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करून उपचार घ्यावे लागत आहे.
- औषधी पुरवठादारांच्या बिलांवर संबंधित अधिकारी स्वाक्षरीच करीत नाही
प्राप्त माहितीनुसार, जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना औषधी पुरवठा करणाऱ्या बिलांवर संबंधित अधिकारी स्वाक्षरी करीत नाही. यामुळे पुरवठादाराने औषधांपासून ते इतरही साहित्याचा पुरवठा थांबवला आहे. यामुळे कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्यक किमोथेरपीची प्रक्रियाच आठ दिवसांपासून बंद आहे. अप्रत्यक्षरीत्या मेडिकल प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रुग्णाभोवती कॅन्सरचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे.
-किमोथेरपीसाठी बाहेरून औषधी विकत घेतले
अमरावती जिल्ह्यातून मेडिकलमध्ये उपचारासाठी ४२ वर्षीय आईला घेऊन आलेल्या तिच्या मुलाने सांगितले, आईला पोटाचा कॅन्सर आहे. आमच्याकडे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड आहे. यावरून मेडिकलमध्ये नि:शुल्क उपचार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु जनआरोग्य योजनेतून किमोथेरपीसाठी लागणारे इंजेक्शनच मिळाले नाही. यामुळे पदरमोड करून हे इंजेक्शन बाहेरून विकत आणावे लागले.