कॅन्सर रुग्णांची धावपळ थांबणार
By admin | Published: June 25, 2014 01:26 AM2014-06-25T01:26:28+5:302014-06-25T01:26:28+5:30
कॅन्सरच्या रु ग्णाला रक्त मिळण्यासाठी होणारी नातेवाईकांची धडपड आता थांबणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठवणूक केंद्र
राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन
नागपूर : कॅन्सरच्या रु ग्णाला रक्त मिळण्यासाठी होणारी नातेवाईकांची धडपड आता थांबणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठवणूक केंद्र सुरू केले आहे. मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, सचिव अशोक क्रिपलानी, रंधिर झव्हेरी, महेश साधवानी, सुधीर भिवापूरकर, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. विजय तुंगार व हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, जागरूकतेचा अभाव, उशिरा निदान यामुळे कॅन्सरचे विदर्भात प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. रक्त साठवणूक केंद्रामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना २४ तास रक्त उपलब्ध होईल.
कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी सर्वांंनी मिळून काम करणे आवश्यक आहे. शॉ यांनी आपल्या भाषणातून रक्तदानाचे आवाहन केले. ते म्हणाले, कॅन्सर रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्त लागते. यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे. हॉस्पिटलमधील या रक्त साठवणूक केंद्राचा फायदा रुग्णांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
डॉ. शर्मा म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २००३ मध्ये आचार्य तुलसी ब्लड बँकेच्या नावाने रक्तपेढी चालायची. परंतु नंतर ती बंद पडली. आता रक्तपेढी तर नाही परंतु रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यात यश आले आहे.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने हे केंद्र सुरू राहील. सुरुवातीला प्रत्येक ग्रुपच्या रक्ताच्या पिशव्या ठेवण्यात येईल. नंतर मागणीनुसार त्यात वाढ करण्यात येईल.
आभार प्रदर्शन डॉ. अंजली कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाला हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. अशोक पत्की व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)