कोंढाळी येथे कर्कराेग तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:08+5:302021-06-16T04:12:08+5:30
काेंढाळी : राज्य शासनाचा आराेग्य विभाग आणि नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मानव ...
काेंढाळी : राज्य शासनाचा आराेग्य विभाग आणि नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मानव विकास याेजनेंतर्गत काेंढाळी (ता. काटाेल) येथे कर्कराेग तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ९७ नागरिकांची कर्कराेग तपासणी करण्यात आली. यात पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, सरपंच केशव धुर्वे, संजय राऊत, आकाश गजबे, नितीन ठवळे उपस्थित हाेते. कॅन्सर हाॅस्पिटलच्या कर्कराेग तज्ज्ञ डॉ. वंदना मोहता, डॉ. अपूर्वा पांडे, डॉ. स्नेहल, कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाळके, डॉ. अश्विनी दातीर, दीप्ती पटेल यांनी उपस्थितांना कर्कराेगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शिवाय, तपासणी कार्यात सेवा प्रदान केली. या शिबिरात ९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात पाच जण संशयित आढळून आले, अशी माहिती डॉ. वंदना मोहता यांनी दिली.
डॉ. वंदना मोहता यांनी स्तन व इतर कर्कराेगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचार पद्धती, हा आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या आजाराच्या तिसऱ्या व चाैथ्या टप्प्यातील रुग्णाची अवस्था उपचार करण्यात येणाऱ्या अडचणी या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात खर्रा व तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढल्याने कर्कराेग बळावत असल्याची माहिती डॉ. जयश्री वाळके यांनी दिली. तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे यांनी प्रास्ताविकातून या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला. काटाेल तालुक्यात आशासेेविकांच्या माध्यामातून संशयित कर्कराेग रुग्णांचा शाेध घेणे सुरू असल्याचे डाॅ. शशांक व्यवहारे यांनी स्पष्ट केले.