नागपुरात कचरा वेचणाऱ्यांना कॅन्सरची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 09:43 PM2019-08-10T21:43:59+5:302019-08-10T21:48:15+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामाजिक दंत शास्त्र विभागाच्यावतीने भांडेवाडी येथे दोन दिवस शिबिर घेण्यात आले. यात ८२ टक्के म्हणजे १०५ जण तंबाखू व्यसनाचा आहारी गेल्याचे आढळून आले.

Cancer Symptoms for Garbage Traders in Nagpur | नागपुरात कचरा वेचणाऱ्यांना कॅन्सरची लक्षणे

नागपुरात कचरा वेचणाऱ्यांना कॅन्सरची लक्षणे

Next
ठळक मुद्देशासकीय दंत महाविद्यालयाने केले निरीक्षणमुखपूर्व कर्करोगाच्या ४४ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण नागपूरचा कचरा जिथे टाकला जातो त्या भांडेवाडी डम्पिंग स्टेशनमध्ये सामान्य माणूस पाच मिनिटे उभा राहू शकत नाही एवढी घाण व दुर्गंधी असते. मात्र याच कचऱ्यावर अनेकांचे घर चालते. कचऱ्यातून मिळणारे प्लास्टिक, रद्दी पेपर भंगारात विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. यामधील १२८ महिला, पुरुष, तरुण आणि बालकांची तपासणी केली असता यातील ४४ जणांमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे आढळून आली. धक्कादायक म्हणजे, यांना आपण कॅन्सरच्या विळख्यात असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
जाहिरातीचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु अशीही एक मानसिकता आहे की घाणीत काम करायचे असेल, तर कुठले तरी व्यसन असावे. याच विचारातून बहुसंख्य कचरा वेचणारे व्यसनाधिन झाले आहेत. यात पुरुषांसह महिला व बालकांचाही समावेश आहे. याची माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना मिळताच त्यांनी या भागात मुख तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील सामाजिक दंत शास्त्र विभागाच्यावतीने भांडेवाडी येथे विभागाचे प्रमुख डॉ. सचिन खत्री व डॉ. रोहित शिंघाई यांच्या नेतृत्वात ४ ऑगस्ट व ६ ऑगस्ट असे दोन दिवस शिबिर घेण्यात आले. यात १२८ लोकांची तपासणी करण्यात आली. यात ८२ टक्के म्हणजे १०५ जण तंबाखू व्यसनाचा आहारी गेल्याचे आढळून आले.

-३६ जणांचे तोंड उघडणे बंद
१२८ लोकांच्या केलेल्या तपासणीत ३६ जणांचे तोंड दोन बोटापेक्षा जास्त उघडत नसल्याचे तर १० जणांच्या तोंडाच्या आत पांढरा चट्टा असल्याचे दिसून आले. ही दोन्ही लक्षणे ‘ओरल सबम्युकस फायब्रोसीस’ म्हणजे मुखपूर्व कर्करोगाची आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास साधारण १० वर्षांत हा आजार तोंडाच्या कॅन्सरमध्ये बदलतो. शेवटच्या टप्प्यातील या कॅन्सरवर उपचारही शक्य होत नसल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो.

- उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न
तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन धोकादायक ठरते. कारण, हे व्यसन साधारण दहा वर्षानंतर मुखाच्या कर्करोगात बदलते. तपासणीत आढळून आलेल्या मुखपूर्व कर्करोगाचा ४४ रुग्णांना उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Cancer Symptoms for Garbage Traders in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.