आरपीएफची परीक्षा रद्द झाल्याने उमेदवार संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:49 PM2019-03-27T23:49:38+5:302019-03-27T23:50:17+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने ७९८ शिपाई पदाच्या भरतीसाठी बुधवारी संगणक परीक्षा घेण्यात येणार होती. ‘श्री साई कॉम्प्युटर्स ऑनलाईन एक्झाम’ तेजस्विनी ज्युनिअर कॉलेज कोराडी येथे परीक्षेचे केंद्र होते. नागपूरसह विदर्भ आणि पुणे व मुंबई येथून परीक्षार्थी पोहचले होते. पण ऐनवेळी कुठलेही कारण न देता परीक्षा रद्द झाल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरच परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने ७९८ शिपाई पदाच्या भरतीसाठी बुधवारी संगणक परीक्षा घेण्यात येणार होती. ‘श्री साई कॉम्प्युटर्स ऑनलाईन एक्झाम’ तेजस्विनी ज्युनिअर कॉलेज कोराडी येथे परीक्षेचे केंद्र होते. नागपूरसह विदर्भ आणि पुणे व मुंबई येथून परीक्षार्थी पोहचले होते. पण ऐनवेळी कुठलेही कारण न देता परीक्षा रद्द झाल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरच परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला.
आरपीएफने शिपाई या पदाकरिता (७९८) जानेवारी महिन्यात जाहिरात काढली होती. या पदाकरिता राज्यातील तरुणांनी अर्ज केले. परीक्षा अर्ज भरण्याकरिता चालानसाठी काही उमेदवारांनी ५०० तर काही जणांनी २०० रुपये शुल्क भरले. अर्जाच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले. पहिल्या टप्प्यात संगणक परीक्षा, तर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी होणार होती. बुधवार २७ मार्च रोजी आयोजित संगणक परीक्षेकरिता कोराडी मार्गावरील तेजस्विनी ज्युनियर कॉलेज हे केंद्र देण्यात आले. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी सांगितले की, ११.१५ वाजता पेपर होता. जवळपास २०० उमेदवार केंद्रावर पोहोचले, मात्र त्यांना आत घेतले नाही. तसेच तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द झाल्याचे सांगितले. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. परीक्षेसाठी उमेदवार मुंबई, पुणे, भुसावळ आदी शहरातून आले होते. त्यामुळे संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरच नारेबाजी केली. परीक्षा रद्द झाल्याचे आधी कळविले असते तर वेळ आणि पैसा वाचला असता, अशी भावना सुबोध चहांदे या परीक्षार्थ्याने आणि इतर उमेदवारांनी व्यक्त केली.