Maharashtra Election 2019; उपराजधानीतील उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:01 AM2019-10-12T11:01:04+5:302019-10-12T11:03:42+5:30

विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही.

Candidates in Nagpur are not higher educated | Maharashtra Election 2019; उपराजधानीतील उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

googlenewsNext
ठळक मुद्दे५७ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’१३ टक्केच पदव्युत्तर

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर १३ टक्के उमेदवारच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडे तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीतच. अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे, हेच चित्र समोर येत आहे.
विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधर
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ८.३३ टक्के उमेदवार हे विधी पदवीधर आहेत. विज्ञान (३.५७ %), वाणिज्य (७.१४ %), कला (३.५७ %), ‘बीबीए’ (२.३८ %) पदवीधरदेखील मैदानात आहेत. १३.१० टक्के उमेदवारांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे. यात ‘एमएस्सी’, ‘एमए’, ‘एमबीए’, एमडी’, ‘एमएड’ हे अभ्यासक्रम शिकलेल्यांचा समावेश आहे. ३.५७ % उमेदवार हे आचार्य पदवीप्राप्त आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांचे शिक्षण
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ

या मतदारसंघातील १७ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे. प्रत्येक एक उमेदवार ‘आयटीआय’ व पदविका शिकलेला आहे. दोन जणांकडे अनुक्रमे विज्ञान व वाणिज्य शाखेची पदवी आहे. तर दोन उमेदवारांनी ‘एलएलबी’ केले आहे. एका उमेदवाराने ‘एमटेक’ केले असून एकच उमेदवार ‘पीएचडी’ प्राप्त आहे.
उत्तर नागपूर मतदारसंघ
या मतदारसंघातील १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे. एका उमेदवाराने पदविका तर दोघांनी ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले आहे. दोघांनी ‘बीबीए’, तर आणखी दोघांनी विज्ञान व कला शाखेची पदवी संपादित केली आहे. एका उमेदवाराने ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केले असून एक उमेदवार ‘पीएचडी’धारक आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ
येथील २० उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे ११ उमेदवार हे बारावीपर्यंतच शिक्षित आहेत. एका उमेदवाराने पदविका घेतली आहे. दोघांनी ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले आहे. दोघांनी कला तर एकाने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे एक उमेदवार ‘एमटेक’ आहे तर एकाने ‘पीएचडी’ पूर्ण केली आहे. एकाने शिक्षणाबाबत माहितीच दिलेली नाही.
मध्य नागपूर मतदारसंघ
मध्य नागपुरातील १३ पैकी दोन उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतदेखील झालेले नाही. दोघांनी दहावी तर एकाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ‘आयटीआय’ (एक), पदविका (दोन), ‘एलएलबी’ (एक), बीएस्सी (एक) असे उमेदवारांचे शिक्षण आहे. प्रत्येकी एका उमेदवाराने ‘एमबीए’, ‘एमएड’ व ‘एमएससी’ पदवी प्राप्त केली आहे.
पूर्व नागपूर मतदारसंघ
या मतदारसंघात सातपैकी अवघा एकच उमेदवार पदवीधर आहे. एका उमेदवाराने दहावीहून कमी शिक्षण घेतले आहे. तिघांनी दहावीपर्यंत तर दोघा उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. येथील एकही उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नाही.
पश्चिम नागपूर मतदारसंघ
येथील १२ पैकी ३ उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तर तीन उमेदवार हे दहावीपर्यंतदेखील शिकलेले नाहीत. तीन उमेदवार ‘बीकॉम’ पदवीधर असून एकाने कला शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. एक उमेदवार वैद्यकीय शिक्षण घेतलेला आहे.

Web Title: Candidates in Nagpur are not higher educated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.