तिघांचे उमेदवारी अर्ज रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:03+5:302021-09-17T04:13:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजार समितीचा व्यापारी परवाना घेतला असताना सेवा सहकारी संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर या तिघांचे उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक गाैतम वालदे यांनी रद्द ठरविले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. काटाेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर या तिघांनी सेवा सहकारी संस्था गटातून आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. हे तिघेही काटाेल येथील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेचे संचालक व पदाधिकारी आहेत. या जिनिंग प्रेसिंगसाठी त्यांनी काटाेल कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यापारी परवाना घेतला आहे.
परिणामी, अजय लाडसे यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा काटाेल येथील सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली हाेती. या तिघेही जिनिंग प्रेसिंगचे पदाधिकारी असून, या संस्थेकडे व्यापारी परवाना असल्याचे अजय लाडसे यांनी पटवून दिले हाेते. त्यामुळे सहायक निबंधकांनी या तिघांचेही उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान फेटाळले हाेते.
...
अपिलातही दिलासा नाही
चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर यांनी सहायक निबंधक यांच्या निर्णयाच्या विराेधात जिल्हा उपनिबंधक गाैतम वालदे यांच्याकडे अपील करून दाद मागितली हाेती. यावर ९ व १४ सप्टेंबर राेजी सुनावणी झाली असून, बुधवारी (दि. १५) निकाल देण्यात आला. ती संस्था शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करून त्याचे जिनिंग प्रेसिंग केले जात असल्याचे स्पष्ट हाेताच, गाैतम वालदे यांनी काटाेल येथील सहायक निबंधकांचा निर्णय कायम ठेवला. तिघांच्यावतीने ॲड. आनंद देशमुख तर अजय लाडसे यांच्यावतीने ॲड. महेश धात्रक यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे या तिघांना अपिलातही दिलासा मिळाला नाही.
160921\screenshot_2021_0916_183109.png
ठाकूर,डेहनकर व मानकर यांचे सेवा सहकारी संस्थेतून आलेले उमेदवारी अर्ज रद्द