डॉक्टरवरील हल्ल्याविरोधात कॅँडल मार्च
By Admin | Published: October 3, 2015 03:07 AM2015-10-03T03:07:58+5:302015-10-03T03:07:58+5:30
मुंबईच्या केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना केलेली मारहाणीची घटना ताजी असताना ..
मेडिकल : निवासी डॉक्टरांची निदर्शने
नागपूर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना केलेली मारहाणीची घटना ताजी असताना बुधवारी रात्री यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर हल्ला करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री नागपूर मेडिकल कॉलेजच्या मार्डच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आंतरवासिता महिला डॉक्टर वसतिगृहामधून अपघात विभागात ड्युटीवर जात होती. याच दरम्यान तिच्यावर दोन अज्ञात व्यक्तीने हल्ला करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला निवासी डॉक्टरांची संस्था ‘सेंट्रल मार्ड’ने गंभीरतेने घेतले. केईएमचे प्रकरण ताजे असताना घडलेली ही घटना धक्कादायक असल्याचे सेंट्रल मार्डचे सचिव डॉ. आयुध मकदुम यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ हा ‘कँडल मार्च’ काढण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मेडिकल मार्डने गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास मेडिकलच्या परिसरात कँडल मार्च काढला. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी नारे-निदर्शनेही करण्यात आली. या मार्चचे नेतृत्व डॉ. आयुध मकदुम, मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. स्वर्णांत परमार, डॉ. अमित बोबडे, डॉ. युवराज लहारे, डॉ. विशाल वाघ, डॉ. निखील कामडी, डॉ. मयाराम भारती यांनी केले. (प्रतिनिधी)