उमरेड परिसरात गांजा तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:29+5:302021-06-21T04:07:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कुही येथून उमरेडच्या दिशेने दुचाकीच्या माध्यमातून गांजा तस्करी करण्याचा गोरखधंदा उमरेड पोलिसांनी उजेडात आणला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कुही येथून उमरेडच्या दिशेने दुचाकीच्या माध्यमातून गांजा तस्करी करण्याचा गोरखधंदा उमरेड पोलिसांनी उजेडात आणला. दाेन्ही आराेपी कुही परिसरातील असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दाेघांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून १७,२०० रुपये किमतीचा १ किलो २४० ग्रॅम गांजा तसेच ६० हजाराची दुचाकी असा एकूण ७७,२०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी हस्तगत केला.
शिवराम तातोबा खडसे (४०, रा. मुसळगाव ता. कुही) व एका महिला आराेपीला अटक केली आहे. कुही येथून रविवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास एमएच-४०/सीबी-४१०७ या क्रमांकाच्या दुचाकीने आरोपी शिवराम आणि मनिषा नामक महिला हे दोघेही उमरेडच्या दिशेने येत होते. त्यांच्याकडे विक्रीकरिता गांजा असल्याची गोपनीय माहिती उमरेड पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या नेतृत्त्वात सापळा रचत गावसूत शिवारात दाेघांनाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत गांजा आढळून आला. या कारवाईमुळे उमरेड परिसरात खळबळ उडाली आहे.
उमरेड पोलीस दोन्ही आरोंपीची कसून चौकशी करीत असून, गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी आराेपींविरुद्ध एनडीपीएस कलम २०, २९ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, सहायक पाेलीस निरीक्षक राजेश पाटील, उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे, अरुण जयसिंगपुरे, रूपेश महाजन, अरविंद चव्हाण, तिलक रामटेके, गोवर्धन सहारे, उमेश बांते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.