कस्तुरचंद पार्कमधील खोदकामात सापडलेल्या तोफा सैन्याच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:40 AM2019-10-18T00:40:10+5:302019-10-18T00:48:25+5:30
ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. सैन्य दलाने या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. मैदानावर सौंदर्यीकरणासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान बुधवारी रात्री या चारही तोफा आढळून आल्या. या तोफा २०० वर्षे जुन्या असून भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शिवाय मैदानात आणखी दारूगोळा सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर सध्या वॉकिंग ट्रॅक निर्मिती व वृक्षारोपणासह सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. याअंतर्गत पार्कवर खोदकाम सुरू आहे. बुधवारी रात्री मैदानात उभी असलेल्या वास्तुजवळ काम सुरू असताना अचानक या चारही तोफा आढळून आल्या. सोबत तोफा ठेवण्यासाठी उपयोगात येणारे दोन स्टॅँडही होते. याबाबत पुरातत्व विभाग, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचना करून त्या बाजुला काढून ठेवल्याची माहिती सौंदर्यीकरण कामाचे आर्किटेक्ट व हेरिटेज समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी दिली. गुरुवारी या तोफा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मैदानावर जमली होती. याबाबत मोठी उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत होती.
यातील दोन तोफा दहा फुट आणि दोन साडे नउ फुटांच्या असून यांचे वजन जवळपास १००० किलोग्रॅमच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तोफा येथे कशा आल्या संशोधनाचा विषय आहे. साधारणत: २०० वर्षापूर्वी राजे रघुजी भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धादरम्यान या तोफा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या तोफा लांब पल्ल्याच्या असल्याने ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीकडून बनविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कुणाकडून वापरण्यात आल्या, याबाबत संभ्रम आहे. ब्रिटीशांनी युद्धात या तोफा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र नागपूरचे इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे यांच्यानुसार भोसल्यांनी इस्ट इंडिया कंपनीकडून या तोफा विकत घेतल्या होत्या व त्यांनीच त्या युद्धात वापरल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान सैन्यदलाने या चारही तोफा ताब्यात घेत सीताबर्डी किल्ल्यामध्ये नेल्या. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोफांची पाहणी केली असून सविस्तर संशोधन करून त्या किती वर्षे जुन्या आहेत, कधी आणि कुठल्या तोफखान्यात बनविण्यात आल्या, याबाबत माहिती काढली जाणार असल्याचे सांगितले आहे.
तोफा भोसल्यांच्या की इंग्रजांच्या?
मैदानावर सापडलेल्या चार तोफांबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सीताबर्डीच्या भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत या तोफा वापरण्यात आल्या, यावर एकमत असले तरी त्या कुणी वापरल्या यावर संभ्रम आहे. या तोफा लांब पल्ल्याच्या आहेत. राजे मुधोजी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार या तोफांद्वारे मारलेला गोळा महालच्या किल्ल्यापर्यंत पोहचला होता व तो आमच्या राजवाड्यात ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे युद्धात इंग्रजांकडून या तोफा वापरण्यात आल्या व भोसल्यांच्या पराभवात त्या निर्णायक ठरल्याचा दावा केला जात आहे. भोसल्यांचा तोफखाना सक्करदरा येथे होता, मात्र त्यात लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफा बनविण्यात येत नव्हत्या. मात्र शस्त्रांचा व्यापार करायला आलेल्या इस्ट इंडिया कंपनीकडून भोसल्यांनी अशा सहा तोफा खरेदी केल्या होत्या. या युद्धात त्या भोसल्यांनी वापरल्याच्या भा. रा. अंधारे यांच्या दाव्याला मुधोजी भोसले यांनी दुजोरा दिला आहे.
पुरातत्त्व विभाग करणार संशोधन
सध्या ११८ प्रादेशिक बटालियन या सैन्यदलाच्या तुकडीने या तोफा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत व त्या सीताबर्डीच्या किल्ल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील सैन्य अधिकाऱ्याने दिली. मात्र पुरातत्त्व विभाग यावर संशोधन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारचा पुरातन दारूगोळा किल्ल्यात सैन्याच्या देखरेखीत ठेवण्यात आला असून त्यावरून या तोफांची माहिती काढली जाणार आहे. तोफा किती वर्षे जुन्या आहेत, कुठे बनविण्यात आल्या, याबाबत माहिती मिळेल. तोफांवर ‘केजेएफ’ असे लिखित आहे, त्यामुळे कंपनीच्या जबलपूर येथील तोफखान्यात १८०० ते १८२० यादरम्यान बनविण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुरातत्त्व विभाग सैन्यावर नाराज
सैन्य दलाने पार्कवर सापडलेल्या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या तोफा ऐतिहासिक वारसा असल्याने पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देणे आवश्यक होते. मात्र सैन्याने विभागाला तपासणी करू न देता तोफा किल्ल्यात नेल्याचे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र बुधवारपासून या तोफा सापडल्याची सूचना दिली असताना विभागाचे कर्मचारी उशिरा पोहचल्याचे ताशेरे पुरातत्त्व विभागावरच ओढले जात आहेत.