कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:49 AM2021-06-30T10:49:25+5:302021-06-30T10:50:12+5:30

Nagpur News वाहनाच्या हॉर्नचा आवाज ८९ डेसिबलपेक्षा अधिक नसावा, असा नियम आहे. मात्र, हे डेसिबल कधीच मोजले जात नाही. प्रेशर हॉर्नचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक असतो.

Can't the police hear the honking horn, brother? | कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

googlenewsNext
ठळक मुद्दे अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांवर अद्यापही नाही पुरेसा आवर

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कर्णकर्कश हॉर्न ही आता मोठी समस्या ठरू पाहत आहे. नागपुरातही असा प्रकार पाहावयास मिळत असला तरी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या कारवायांची संख्या मात्र त्या मानाने कमी आहे.

वाहनाच्या हॉर्नचा आवाज ८९ डेसिबलपेक्षा अधिक नसावा, असा नियम आहे. मात्र, हे डेसिबल कधीच मोजले जात नाही. प्रेशर हॉर्नचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक असतो. अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांवर प्रेशर हॉर्न असतात. वाहतूक पोलीस आणि आरटीओला कारवाईचा अधिकार असूनही त्यांच्याकडे ध्वनिप्रदूषण मापक यंत्र नसते.

अनेकदा सिग्नलवर थांबल्यानंतरही जोरजोराने हॉर्न वाजविण्याचे प्रकार घडतात. भरधाव मोटारसायकल चालविणारे तरुण प्रेशर हॉर्नचा वापर करतात. समोरच्या वाहनाजवळ पोहोचताच हॉर्न वाजवितात. त्यामुळे समोरील व्यक्ती घाबरून व वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतो.

 

 कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...

कर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस आणि आरटीओला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्यानेही कारवाई केली जाऊ शकते, त्यासाठी ध्वनिमापक यंत्राद्वारे संबंधित यंत्रणांनी ही कारवाई केली पाहिजे. कलम १७७ नुसार, अशा प्रथम गुन्ह्यात १०० रुपये नंतरच्या गुन्ह्यासाठी ३०० रुपये दंडाची तरतूद आहे.

 

 फॅन्सी हॉर्नची फॅशन

‘प्रेशर हॉर्न’ आणि चित्रविचित्र हॉर्न ही आता समस्या बनली आहे. असे हॉर्न बसवून देणारे कारागीरही आहेत. मुलाच्या रडण्याचा, मांजराच्या ओरडण्याचा, अचानकपणे कुणी ओरडण्याचा असे बरेच विचित्र आवाज काढणारे हे हॉर्न आहेत. काही वाहनांवर तर पोलिसांच्या सायरनसारखे हॉर्न असतात. त्यासाठी पैसा मोजून हा उपद्व्याप केला जातो.

 

 कानाचेही आजार वाढू शकतात.

- दीर्घकालीन आवाजामुळे भविष्यात बहिरेपणा येऊ शकतो. दुकानदार, त्यात काम करणाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे.

- मोठ्या आवाजामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, एकाग्रता जाणे, बहिरेपणा येणे या आजारांची शक्यता असते.

- ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीनांमध्ये यामुळे बहिरेपणाची समस्या लवकर येते.

- लहान मुलांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. दचकल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.

- प्रेशर हॉर्नमुळे कानाचा पडदा फाटणे, कानातील नाजूक हाडांचे नुकसान होऊन कायम बहिरेपणा येण्यासारखे प्रकार घडतात.

 

...

Web Title: Can't the police hear the honking horn, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.