नागपूर जिल्हा परिषदेच्या कॅन्टींनमध्ये सुरू होते कॅटरींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 09:31 PM2018-04-10T21:31:46+5:302018-04-10T22:53:56+5:30
सरपंच भवनात येणाऱ्या पाहुण्यांसाठी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांसाठी, अभ्यागतांसाठी सरपंच भवनात कॅन्टींनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कॅन्टींन एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. परंतु कंत्राटदार कॅन्टीनचा उपयोग कॅटरींगसाठी करीत होता. सोमवारी जि.प. अध्यक्षांनी थेट धाड टाकून कॅन्टीनच्या नावाने सुरू असलेल्या कॅटरींगची पोलखोल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरपंच भवनात येणाऱ्या पाहुण्यांसाठी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी, अभ्यागतांसाठी सरपंच भवनात कॅन्टींनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कॅन्टींन एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. परंतु कंत्राटदार कॅन्टीनचा उपयोग कॅटरींगसाठी करीत होता. सोमवारी जि.प. अध्यक्षांनी थेट धाड टाकून कॅन्टीनच्या नावाने सुरू असलेल्या कॅटरींगची पोलखोल केली. अध्यक्षांच्या या धडक कारवाईमुळे अधिकारीही अवाक् झाले. विशेष म्हणजे या कंत्राटदाराने कॅन्टीनमध्ये राहुटीही केली होती.
तुषार मानकर या कंत्राटदारास कॅन्टीनचे कंत्राट दिले आहे. ते ‘एटूझेड’ नावाने कॅटरिंग सर्व्हिसेस चालवितात. करारानुसार कंत्राटदाराला चहा, नाश्ता, जेवण वाजवी दरात उपलब्ध करून द्यायचे आहे. परंतु हे कॅन्टीन उघडतच नसल्याची तक्रार अध्यक्षांकडे आली होती. मंगळवारी दुपारी अध्यक्ष निशा सावरकर व सभापती उकेश चव्हाण यांनी सरपंच भवनातील कॅन्टीनला भेट दिली असता. कॅन्टीनचा दरवाजा लागलेला होता. दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता, कॅन्टीनसाठी आवश्यक कुठलीही सोयीसुविधा तिथे दिसली नाही. बसायला टेबल, खुर्च्या तिथे नव्हत्या. कॅटरींगचे काम करणारे काही लोक व गाद्या, साहित्य तिथे आढळून आले. त्याचबरोबर कंत्राटदाराने आपल्या घरातील सामान कॅन्टीनमध्ये आणून ठेवले होते. तिथे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॉकर, पलंग आढळले.
जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनची अशी अवस्था बघून, अध्यक्षांनी जि.प.च्या सीईओ, अतिरिक्त सीईओ यांना कॅन्टीनच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले. अधिकारी कॅन्टीनची ही अवस्था बघून अवाक् झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे कॅन्टीन सुरूच नाही. नियमित चहा, नाश्ता सुद्धा मिळत नाही. कॅन्टीनचा दरवाजा नेहमीच बंद असतो. कॅन्टीन चालक हा कॅटरींगचे बाहेरचे आॅर्डर घेऊन अन्न शिजवितो. त्याच्या कॅटरींगचे सर्व साहित्य तेथे पडलेले असते. आता तर त्याने कॅन्टीच्या साहित्याबरोबरच घरातील साहित्य सुद्धा कॅन्टीनमध्ये आणून ठेवले आहे. कंत्राटदाराकडून अधिकाऱ्यांच्या डोळ्यापूढे सर्रास शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होत असताना अधिकारी गप्प होते.
बांधकाम विभागाचे दूर्लक्ष
बांधकाम विभागाच्या माध्यमातून कॅन्टीनची कंत्राट प्रक्रिया पार पाडली जाते. सलग दोन वर्षापासून हे कॅन्टीनचे कंत्राट मानकर याला मिळत आहे. ज्या उद्देशाने कॅन्टीन चालवायला दिले तो उद्देश पूर्ण होत नसतानाही बांधकाम विभागातील अधिकारी गप्प आहेत. दोन वर्षापासून शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होत असतानाही साधी तक्रार सुद्धा नाही.
कंत्राट रद्द करावे
कंत्राटदार शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. सीईओंसह अधिकाऱ्यांनीसुद्धा बघितले आहे. दोन वर्षापासून कंत्राटदार मनमानी करीत असतानाही काहीच कारवाई नाही, याचाच अर्थ अधिकाऱ्यायांचे कंत्राटदाराशी आर्थिक हितसंबंध दिसून येतात. कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे आदेश सीईओंना दिले आहे.
निशा सावरकर, अध्यक्ष, जि.प.