देशात ३० ‘ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:38 PM2019-09-16T12:38:32+5:302019-09-16T12:38:57+5:30
येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून अर्थव्यवस्था येत्या काळात पाच ‘ट्रिलियन डॉलर’चा निश्चित टप्पा गाठेल यात काहीच शंका नाही. इतकेच काय तर देशातील तरुणांची बुद्धिमत्ता पाहता भारतात तर ३० ‘ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता आहे असे मत ‘किर्लोस्कर ब्रदर्स लि.’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्यस्थितीत भारत संक्रमणाच्या काळात आहे. विकसनशील देश ते विकसित देश असा भारताचा प्रवास सुरू आहे. येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून अर्थव्यवस्था येत्या काळात पाच ‘ट्रिलियन डॉलर’चा निश्चित टप्पा गाठेल यात काहीच शंका नाही. इतकेच काय तर देशातील तरुणांची बुद्धिमत्ता पाहता भारतात तर ३० ‘ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता आहे असे मत ‘किर्लोस्कर ब्रदर्स लि.’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७ व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ.शैलेश साठे व निरनिराळ्या शाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते. ‘आयआयटी’तून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हा विदेशात जाण्याकडे असतो. मात्र ‘एनआयटी’मधील विद्यार्थी हे देशातील विविध संस्थांमध्ये काम करून देशसेवा करण्यात जास्त समाधान मानतात. तंत्रज्ञानामुळे काम करण्याची प्रक्रिया, वातावरण इतकेच काय तर उद्योगांच्या कार्यपद्धतीतदेखील आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या नकारात्मक बाबींवर चर्चा होते, मात्र यातून निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागली असून आपल्यासाठी ती सकारात्मकच गोष्ट आहे. अभियंत्यांनी उद्योगक्षेत्रात काम करताना ‘क्रिएटिव्ह’ काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी चौकटीबाहेर विचार करून सातत्याने नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची तयारी असायला हवी.
भारतात राहून देशाला प्रगतीकडे नेण्याचे सारथ्य करण्याची संधी तुमच्यासमोर आहे व त्याचे समाधान वेगळेच राहणार आहे, असे किर्लोस्कर म्हणाले. अभियंता दिनाचे औचित्य साधत संस्थेच्यावतीने दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.प्रमोद पडोळे यांनी पदवीदान करण्याअगोदर ‘डायरेक्टर्स रिपोर्ट’ सादर केला. डॉ.शैलेश साठे यांनी आभार मानले.
वाहनक्षेत्रातील आर्थिक मंदी तात्पुरती
दरम्यान, कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना संजय किर्लोस्कर यांनी वाहनक्षेत्रातील आर्थिक मंदी ही तात्पुरती असल्याचे मत व्यक्त केले. वाहनक्षेत्रातच सध्या काही प्रमाणात मंदी आहे. मात्र अनेक उद्योगक्षेत्रामध्ये चांगली वाढ होत आहे, असा दावा त्यांनी केला.
१,१५३ विद्यार्थ्यांना पदवीदान
दीक्षान्त समारोहात एकूण १ हजार १५३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात १०० विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, २६८ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५३ विद्यार्थ्यांना ‘एमएसस्सी’ तर ६७७ विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी प्रदान करण्यात आली. ५५ जणांना ‘बीआर्क’ ही पदवी देण्यात आली. यंदा आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक ठरले. दरवर्षी ‘व्हीएनआयटी’तील सर्व विभागातून सर्वात चांगली कामगिरी करणाºया विद्यार्थ्याचा सर विश्वेश्वरैया पदक देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा ‘संगणक विज्ञान’ अभियांत्रिकी विभागातील राशी लढ्ढा या विद्यार्थिनीला या पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्थापत्यशास्त्र विभागातील अक्षर रखोलिया या विद्यार्थ्याचा सर्वात जास्त १० पारितोषिकांनी सन्मान झाला. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी मयांक शिवहरे याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल हेमंत करकरे पुरस्कारासह एकूण नऊ पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.
अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणार : राशी लढ्ढा
सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मानित करण्यात आलेली संगणक विज्ञान शाखेची विद्यार्थिनी राशी लढ्ढा हिला अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करायचे आहे. संगणकाच्या माध्यमातून तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात मला माझे योगदान द्यायचे आहे, असे तिने सांगितले. मूळची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील असलेली राशी सध्या मुंबईतील एका कंपनी ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ म्हणून काम करत आहे. मागील चार वर्षे केवळ अभ्यासावरच भर दिला. त्याचे फळ मिळाले असल्याचे तिने सांगितले.
नियोजनातूनच मिळाले यश : अक्षर रखोलिया
मूळचा गुजरातमधील असलेल्या अक्षर रखोलिया याने स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त करत सर्वाधिक पुरस्कार व पदके पटकाविली. मला भविष्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. मला घरच्यांकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत गेले. चार वर्षे अभ्यासावर भर दिला. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास, प्रोजेक्ट्स इत्यादींचे काम सुरू होते, असे त्याने सांगितले.
‘व्हीएनआयटी’त १८० कोटींचा प्रकल्प
यावेळी विश्राम जामदार यांनी आपल्या भाषणात ‘व्हीएनआयटी’च्या ‘मिशन २०२०’वर भाष्य केले. ‘व्हीएनआयटी’चे पुढील वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत ‘सिमेन्स सेंटर आॅफ एक्सेलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. १८० कोटींच्या प्रकल्पातून १२ जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारण्यात येतील. यात ‘स्मार्ट फॅक्टरी’चादेखील समावेश असेल. यामाध्यमातून संस्थेसह विविध तांत्रिक महाविद्यालयांतील ५ ते १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाला चालना देण्यासाठीदेखील या माध्यमातून प्रयत्न होतील, अशी माहिती जामदार यांनी दिली.