फैज फझल इंडिया ग्रीनचा कर्णधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:12 AM2019-08-07T11:12:36+5:302019-08-07T11:13:50+5:30
गतवर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरीच्या बळावर दुसऱ्यांदा रणजी आणि इराणी करंडकावर वर्चस्वाची मोहोर उमटविणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघातील चार खेळाडूंची यंदा दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघात निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गतवर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरीच्या बळावर दुसऱ्यांदा रणजी आणि इराणी करंडकावर वर्चस्वाची मोहोर उमटविणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघातील चार खेळाडूंची यंदा दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघात निवड झाली आहे.
त्यात विदर्भाचा कर्णधार फैज फझल, फिरकीपटू अक्षय वखरे आणि आदित्य सरवटे तसेच यष्टिरक्षक- फलंदाज अक्षय वाडकर यांचा समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन १७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. स्थानिक मोसमातील या पहिल्या स्पर्धेत इंडिया ग्रीनचे नेतृत्व फैज करणार असून वखरे हा देखील याच संघात आहे. वाडकरचा आणि सरवटे यांचा इंडिया रेड संघात समावेश असेल. २०१७-१८ च्या मोसमात दुलिप करंडकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या इंडिया ब्ल्यूचे नेतृत्व फैजकडेच होते.
गतवर्षी दमदार कामगिरी करणाऱ्या फैजने रणजी आणि इराणी करंडकाच्या जेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ११ प्रथमश्रेणी सामन्यात ५० च्या सरारीने ७५२ धावा काढल्या. सर्वाधिक १५१ धावांसह त्याने तोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली होती. केरळविरुद्धच्या उपांत्य सामन्यात सहकारी लवकर बाद झाले असताना फैजने सर्वाधिक ७५ धावा ठोकल्या होत्या. अक्षय वाडकरने ११ सामन्यात गतवर्षी ७२५ धावा केल्या असून विदर्भासाठी सर्वाधिक धावा करण्यात तो तिसऱ्या स्थानी होता. १४४ सर्वाधिक धावसंख्या असलेल्या या फलंदाजाने तीन शतके अािण दोन अर्धशतके ठोकली. यष्टिमागे अक्षयने २१ झेल घेतले आणि सहा फलंदाजांना यष्टिचित करीत एकूण २७ बळी घेण्याची किमया साधली होती. ऑफस्पिनर अक्षय वखरे याने १० सामन्यात ३४ गडी बाद केले. सामन्यात पाच गडी बाद करण्याची कामगिरी त्याने दोनदा तर चार बळी घेण्याची कामगिरी चारददा केली होती.
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात वखरेने ११७ धावात एकूण सात गडी बाद केले. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटे याने ११ सामन्यात ५५ बळी घेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. एका सामन्यात त्याने दहा गडी बाद केले तसेच पाच गडी बाद करण्याची कामगिरी त्याने सहावेळा केली होती. रणजी करंडकाच्या निर्णायक लढतीत सरवटेने ११ गडी टिपले होते.