कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:46 AM2017-07-18T01:46:34+5:302017-07-18T01:46:34+5:30
जरीपटक्यात कोट्यवधी रुपयांची जमीन नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमताने मौजा, खसरा व प्लॉट नंबरमध्ये बदल करून बिल्डरला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जरीपटक्यात मौजा बदलून बिल्डरला
विकल्याचा नासुप्र अधिकाऱ्यांवर आरोप
न्यायालयाचे आदेशही धाब्यावर
अर्ध्या जागेवर बहुमजली इमारत उभी
७४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कुटुंबासह केले बेदखल
योगेंद्र शंभरकर । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यात कोट्यवधी रुपयांची जमीन नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमताने मौजा, खसरा व प्लॉट नंबरमध्ये बदल करून बिल्डरला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नासुप्रने विकलेल्या या जमिनीवर १५,४११ वर्गफुटावर एका बिल्डरने सहा माळ्याचे आलिशान अपार्टमेंट उभारले आहे. तर फिर्यादी ७४ वर्षीय लक्ष्मण प्रल्हादराव सोमकुंवर यांच्या तक्रारीनुसार उर्वरित अर्ध्या भूखंडावर यादव नावाच्या व्यक्तीने बळजबरीने धार्मिक स्थळाचे बांधकाम करून त्यावर कब्जा केला आहे.
ही जमीन मौजा-जरीपटका, खसरा क्रमांक नंबर १९ स्थित नगर भूमापन क्रमांक १३ वर जवळपास पाऊण एकर भूखंड (हेक्टर-३२-आर) आहे. सध्या या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जाते. सन २००७ पर्यंत जरीपटका येथील या जमिनीच्या जवळच फिर्यादी लक्ष्मण सोमकुंवर हे दयालू सोसायटीत आपल्या परिवारासह राहत होते. या जमिनीची मूळ मालक पुरसत बी. मोहम्मद शरीफ (जरीपटका) असून, ती लक्ष्मण यांची मानलेली बहीण होती. त्यांनीच लक्ष्मणला ही जमीन बक्षीस स्वरूपात दिली. परंतु काही वर्षांनंतर या जमिनीवर नासुप्रने दावा केला. न्यायालयाने १९ सप्टेंबर २००६ रोजी लक्ष्मण सोमकुंवर यांच्या
बाजूने निर्णय दिला. यावर भूमी अभिलेख विभागात रजिस्टर्ड बक्षीसपत्र आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ७/१२ दस्तावेजावर फिर्यादी लक्ष्मणराव प्रल्हादराव सोमकुंवर यांचे नाव नोंदविलेले आहे. यानंतरही त्यांच्या नावावरील अर्ध्या जागेवर (१५,४११ वर्गफूट) नासुप्रने कब्जा दाखवून, २५ मे २००७ रोजी या जागेचा लिलाव केला. या लिलावांतर्गत ३० मे २००७ रोजी नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी वरील मौजा-जरीपटकास्थित सोमकुंवर यांच्या जमिनीचा मौजा बदलवून मानकापूर आणि खसरा ५७/२ मध्ये भूखंड दाखवून खरेदीदार चावला याला कब्जापत्र जारी केले. यानंतर खरेदीदार चावलाने बिल्डर वीरेंद्र कुकरेजाला जमीन विकली. आता या जागेवर बिल्डरने बहुमजली अपार्टमेंट बनवून फ्लॅट विकले आहेत.
दस्तावेजांची चौकशी सुरू
विशेष तपास चमू कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार मिळाली आहे. दस्तावेजांची तपासणी केली जात आहे. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे. कब्जेदार बिल्डर आणि इतर लोकांनाही त्यांच्या दस्तावेजांसह बोलावून तपासणी केली जाईल.
सोमनाथ वाघचौरे
सहायक पोलीस आयुक्त, एसआयटी