पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी सेक्युलर देणार का यंग टीसर्चला आॅफर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:33 PM2017-12-02T14:33:43+5:302017-12-02T14:47:41+5:30
सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी विद्यापीठातील संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जितेंद्र ढवळे
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी विद्यापीठातील संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ४ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या या निवडणुकीत शिक्षण मंचाला रोखण्यासाठी सेक्युलर पॅनेल, यंग टीचर्स असोसिएशन, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद आणि पदवीधर महासंघ नवी राजकीय मोट बांधतील, अशी चर्चा आहे.
विद्वत् परिषदेत दमदार यश मिळाल्याने सेक्युलर पॅनेलचा उत्साह वाढला आहे. यासोबत सिनेट आणि अभ्यास मंडळावर नंबर वन राहिल्याने यंग टीचर्स असोसिएशनने पदवीधर मतदारसंघासाठी दंड थोपटले आहेत. पदवीधर मतदारसंघात दहाही जागा ताब्यात घ्यायच्या असल्यास महाआघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो, असा सूर विद्यापीठातील राजकीय गोटात आहे. मात्र सेक्युलर आणि यंग टीचर्सला एकत्र बसविण्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा? कुणी किती जागा लढवायच्या याबाबत दोन्ही गटात सध्या एकमत व्हायचे आहे.
२०१० मध्ये यंग टीचर्ससोबत असलेल्या शिक्षण मंचने अद्याप या मतदारसंघाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही. गतवेळी यंग टीचर्स आणि शिक्षण मंचला एकत्र बसविण्यात डॉ.गौरीशंकर पाराशर यांनी महत्त्वाची भूमिका वठविली होती. मात्र सिनेट आणि विद्वत् परिषदेत धोबीपछाड झाल्याने मंच ही निवडणूक स्वबळावर ताकदीने लढवेल, हे निश्चितच.
विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघावर भाजपची पकड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर प्रा. अनिल सोले यांनी ती कायम ठेवली आहे. विद्यापीठाच्या राजकारणावर नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा यावेळी जास्त प्रभाव असण्याची शक्यता आहे. भाजपने ही निवडणूक मनावर घेतली तर शिक्षण मंचचे कल्याण होईल.
कोण मारणार बाजी ?
२०१० मध्ये या मतदारसंघासाठी ८५,५७६ पदवीधरांनी नोंदणी केली होती. २०१७ मध्ये यात १८ हजार ९०० पदवीधरांची भर पडली आहे. या मतदारसंघासाठी प्रत्यक्षात ३४ हजार ५०० मतदार होते. यात यावेळी घट होण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात एकूण १० जागांसाठीच निवडणूक होईल ज्यापैकी प्रत्येकी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यातील व्यक्ती असेल आणि एक महिला सदस्य असेल.
‘समविचाराने सेक्युलर आणि यंग टीचर्स आले तर हरकत नाही. आम्ही यंग टीचर्ससाठी पाच जागा सोडू. मात्र सध्या कुणाशीही चर्चा झालेली नाही.’
- अॅड.अभिजित वंजारी
नेते, सेक्युलर पॅनेल.
‘कुणी कोणतीही आॅफर दिली नाही. यंग टीचर्स असोसिएशन दहाही जागांवर उमेदवार उभे करेल.’
- डॉ.बबनराव तायवाडे
अध्यक्ष, यंग टीचर्स असोसिएशन
‘ पदवीधर मतदारसंघात संग्राम परिषद चमत्कार घडवेल. दहाही जागा लढवू आणि जिंकूही. समविचारी पक्ष एकत्र आले तर छानच. मात्र सध्या कुणाचीही आॅफर नाही. ’
किरण पांडव
अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद
‘पदवीधर महासंघ तायवाडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवेल. आम्हाला तीन जागा हव्या आहे. कुणासोबत आघाडी करायचे हे एकत्र आल्यावर ठरवू.’
महेंद्र निंबार्ते
नेते, विद्यापीठ पदवीधर महासंघ.