नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
By योगेश पांडे | Published: November 17, 2024 03:38 PM2024-11-17T15:38:55+5:302024-11-17T15:40:30+5:30
पोलिसांना पाहून पळ काढत होते आरोपी, पादचाऱ्यांनादेखील उडविले
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. मात्र एका मुजोर कारचालकाने नाकाबंदीत कार न थांबविता पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविण्यासाठी धावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला फरफटत नेले. यात कर्मचारी जखमी झाला आहे. याशिवाय कारचालकाने दोन पादचाऱ्यांनादेखील उडविले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू येथे ही घटना रात्री घडली.
शनिवारी माध्यरात्री भगवाघर चौक ते मोमीनपुरा चौकादरम्यान पोलिसांची नाकाबंदी होती. पोलीस कर्मचारी अनिल सहस्त्रबुद्धे (४०) हेदेखील कर्तव्यावर होते. अचानक दीड वाजताच्या सुमारास एमएच ०२ सीझेड ६२२१ या क्रमांकाची काळ्या रंगाची कार संशयास्पदरितीने आली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा दिला असता कारचालकाने वेग वाढविला व निघून गेला. सहस्त्रबुद्धे व बिट मार्शल्सने कारचा पाठलाग केला आणि कारला थांबविले. सहस्त्रबुद्धे हे कारच्या मागेच मोटारसायकल लावत असताना कारचालकाने वेगात गाडी रिव्हर्स घेतली. यामुळे कार थेट सहस्त्रबुद्धे यांच्या अंगावर आली. आरोपीने त्यांना फरफटत नेले. यात त्यांच्या पाठ, खांदा व पायाला मार लागला. त्यानंतर कारचालकाने पादचारी वहीद खान तसेच मोहम्मद शाहबाज यांना धडक दिली.
तसेच तीन ते चार मोटारसायकल, एका घराची पायरी व रेलिंगलादेखील धडक दिली. पोलिसांनी पाठलाग करून एका गल्लीत कारला अखेर थांबविले. पोलिसांनी कारचालक संकेत दिलीप कन्हेरे (२३, अष्टविनायक अपार्टमेंट, लुंबिनीनगर, मानकापूर), राहुल प्रेमलाल राऊत (३२, लुंबिनी बुद्धविहाराजवळ, खापरखेडा) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर सोहेल खान (२५, मानकापूर) हा पळून गेला. जखमींना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे घटनास्थळी खळबळ उडाली होती. सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला पालकांच्या हवाली करण्यात आले.