नागपुरात कार चालकाचा हैदोस : अनेक वाहनांना धडक, एकाचा बळी घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:53 PM2020-06-06T19:53:03+5:302020-06-06T19:54:51+5:30
बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेदरकारपणेकार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. प्रकाश अढाऊ असे आरोपी कारचालकाचे नाव असून, तो अजनीच्या समर्थनगरात राहतो.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास आरोपी अढाऊ याने त्याची वॅगनआर कार (एमएच ३१/ एफए १५९४) निष्काळजीपणे चालवून सेमिनरी हिल परिसरात हैदोस घातला. टीव्ही टॉवर चौकाजवळ त्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतरही गती कमी न करता समोरच्या टपरीवाल्याकडे कार वळवली. अनेक जणांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचविला. आरोपीने बाळकृष्ण रामकृष्ण वासनिक (वय ६२, हजारीपहाड) यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली. नागरिकांनी धाव घेतल्याचे पाहून आरोपी कारमधून पळून गेला. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तिकडे धावला. त्यांनी संतप्त जमावाला कसेबसे शांत केले. त्यामुळे परिस्थिती निवळली. गंभीर जखमी झालेल्या वासनिक यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जयराम बाळकृष्ण झलके यांची तक्रार नोंदवून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कारचालक अढाऊविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.