कार लोन घोटाळा पावणेदोन कोटींचा
By admin | Published: March 20, 2017 02:06 AM2017-03-20T02:06:32+5:302017-03-20T02:06:32+5:30
हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसिज बँकेतील कार लोन घोटाळा १ कोटी ७४ लाखांचा असल्याची
सत्र न्यायालय : पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नागपूर : हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसिज बँकेतील कार लोन घोटाळा १ कोटी ७४ लाखांचा असल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केली. या घोटाळ्यातील पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बरडे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार शेख इस्माईल शेख गुलाब आणि त्याची पत्नी रेहाना इस्माईल शेख ही आहे. शेख इस्माईल हा रेल्वेत अधिकारी पदावर आहे. अन्य आरोपींमध्ये मोहम्मद अब्दुल जुबेर मोहम्मद अब्दुल रशीद शेख, रवींद्र विश्वनाथ पोटदुखे आणि विवेक शरद दिवाण यांचा समावेश आहे.
अटक आरोपींमध्ये मोहम्मद जावेद शेख मोहम्मद अब्दुल शेख (३३) रा. चिखली कळमना, भूषण नंदकिशोर चरडे (३३) रा. दर्शन कॉलनी नंदनवन यांचा समावेश आहे. या महाघोटाळ्यात एकूण १५ आरोपी पोलिसांना पाहिजे आहेत.
या प्रकरणाचे फिर्यादी देवराव उरकुडाजी मोहंदेकर (५४) हे असून ते या बँकेचे व्यवस्थापक आहेत. प्रकरण असे की, आरोपींनी गुन्हेगारी कट रचून बनावट कागदपत्रांसह या बँकेत कार लोन प्रस्ताव सादर केले होते. ते मंजूर करून घेतले होते. त्या आधारावर त्यांनी सेंट्रल प्रोव्हिन्स मोटर्स, थापरसन्स मोटर्स आणि स्टार मोटर्सच्या नावे कार खरेदी केल्याचे बनावट इन्व्हाईस प्राप्त केले होते. हे इन्व्हाईस बँकेत सादर करून कर्ज रकमेचे डिमांड ड्राफ्ट प्राप्त केले होते. हे डीडी बनावट कार डीलरच्या खात्यात जमा करून वटवले होते. आरोपींनी बँकेच्या कर्जाचे हप्ते थकीत केल्याने हा मोठा घोटाळा उजेडात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी काम पाहिले. या घोटाळ्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संदीपान पवार हे आहेत. (प्रतिनिधी)