काँग्रेस नेत्यांची गाडी रानडुकरांवर आदळली; सहाही एअर बॅग उघडल्याने बचावले
By कमलेश वानखेडे | Published: August 28, 2023 08:03 PM2023-08-28T20:03:04+5:302023-08-28T20:03:16+5:30
जनसंवाद यात्रेच्या तयारीसाठी भंडारा येथून गोंदियाला जात असताना हिरडा (माली) गावाजवळ काँग्रेस नेत्यांच्या गाडीसमोर अचानक रानडुकरांचा कळप आला.
नागपूर : जनसंवाद यात्रेच्या तयारीसाठी भंडारा येथून गोंदियाला जात असताना हिरडा (माली) गावाजवळ काँग्रेस नेत्यांच्या गाडीसमोर अचानक रानडुकरांचा कळप आला. त्यामुळे गाडी रानडुकरांवर आदळली. सहाही एअरबॅग वेळीच उघडल्याने आत बसलेल्या नेत्यांचा जीव वाचला. जनसंवाद यात्रेचे पूर्व विदर्भ समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह प्रदेश महासचिव झिया पटेल, सचिव राजा तिडके, राजू पालिवाल आदी सोमवारी सायंकाळी भंडारा येथील बैठक आटोपून गोंदियासाठी रवाना झाले.
सायंकाळी ५.३० च्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील हिरडा (माली) या गावाजवळ एकाएक रानडुकरांचा कळप आडवा आला. चालकाने आकस्मिक ब्रेक मारले व गाडी डुकरांवर आदळली. ही टक्कर एवढी भीषण होती की गाडी समोरून चपकली व गाडीतील सहाही एअरबॅग उघडल्या. त्यामुळे गाडीत बसलेले काँग्रेस नेते बचावले. गावंडे यांच्या गुडघ्याला तर जिया पटेल यांच्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. प्राथमिक उपचारानंतर नेत्यांनी गोंदियाची बैठक घेतली.