विलायची एक हजाराने महाग : विक्रीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:48 PM2019-05-28T23:48:10+5:302019-05-28T23:49:38+5:30
गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.
भाववाढीमुळे केवळ २० टक्के विक्री
नागपूर इतवारी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांनी सांगितले की, घाऊक बाजारात विलायचीचे भाव प्रति किलो तब्बल एक हजार रुपयांनी वाढले आहेत. दीड महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात ८ एमएम विलायचीचे प्रति किलो १८०० रुपयांवर असलेले दर २८०० रुपयांवर पोहोचले आहेत. भाववाढीमुळे विक्रीवर परिणाम झाला असून, सध्या बाजारात विलायचीची २० टक्के विक्री राहिली आहे.
देशात विलायचीचे सर्वाधिक उत्पादन केरळ आणि तामिळनाडू राज्यात होते. या दोन्ही राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस फारच कमी आला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, तोडणी कमी झाली आहे. जुलै महिन्यात होणारी तोडणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याचे संकेत असल्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. भाव वाढणार नाहीत, पण मंदी निश्चितच राहील, असे जैन म्हणाले.
भारतीय मसाले दर्जेदार आणि सर्वोत्तम असून जगात सर्वत्र मागणी आहे. त्यामुळे भारतातून विविध प्रकारच्या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. भारतात आफ्रिकन देशातून मसाल्यांची आयात होते. पण दर्जा चांगला नसल्यामुळे बाजारात मागणी कमी आहे.
घाऊक बाजारात तुलनात्मक भाव प्रति किलो
मसाले २०१८ २०१९
विलायची १८०० २८००
लवंग ५८० ६००
जायपत्री १५०० १६७०
मोठी विलायची ८५० ६६०
काळे मिरे ५०० ३८०
तेजपान ६० ७०