अॅनेस्थेशियाच्या प्रगत तंत्रामुळे कमी वेदनेत हृदयाची शस्त्रक्रिया
By सुमेध वाघमार | Published: February 10, 2024 05:20 PM2024-02-10T17:20:10+5:302024-02-10T17:25:21+5:30
नागपूर : मधूमेह, उच्चरक्तदाब आणि अन्य सहव्याधी (को-मॉर्बिडिटिज्) असलेल्या रुग्णांवर सुंगणी (अॅनेस्थेशिया) देऊन शस्त्रक्रिया करणे गुंतागूंतीचे ठरत असे मात्र, ...
नागपूर : मधूमेह, उच्चरक्तदाब आणि अन्य सहव्याधी (को-मॉर्बिडिटिज्) असलेल्या रुग्णांवर सुंगणी (अॅनेस्थेशिया) देऊन शस्त्रक्रिया करणे गुंतागूंतीचे ठरत असे मात्र, आता अॅनेस्थेशियामधील प्रगत तंत्रज्ञान व नव्या रसायनामुळे कमी वेदनेत हृदयाच्या शस्त्रक्रिया शक्य झाल्याचा सूर ‘सीव्हीटी-अॅनेस्थेशियालॉजिस्ट’ डॉक्टरांचा होता.
‘सीव्हीटी अॅनेस्थेशियालॉजिस्ट’ डॉक्टरांच्या ‘स्कॅन’ संघटनेद्वारे ‘आयएसए’ नागपूर शाखा व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरच्या सहकार्याने ‘आयक्टाकॉन-२०२४’ या तीन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला देशविदेशातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ हृदयशल्य चिकित्सक डॉ. पी.के. देशपांडे, आयएसीटीएचे अध्यक्ष डॉ. उदय गंधे, सचिव एन कनकराजन, आयसीसीएचे वाईस चांसलर डॉ. के. मुरलीधर, डॉ. एस. के. देशपांडे, डॉ. विनय कुळकर्णी उपस्थित होते. संचालन डॉ. केतकी रामटेके व डॉ. आसावरी देशपांडे यांनी केले.
शस्त्रक्रियेपूर्वी अॅनेस्थेशिया तज्ज्ञाशी संवाद आवश्यक
‘आयएसीटीए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गंधे म्हणाले, हृदयासह कुठलीही शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकांनी अॅनेस्थेशिया तज्ज्ञाशी संवाद साधायला हवा. कुठली अॅलर्जी किंवा औषधांची रिअॅक्शन आहे, याची माहिती रुग्णानेही द्यायला हवी.
भारतीय तज्ज्ञ पश्चिमेच्या देशांच्या बरोबरीत
राष्ट्रीय सचिव डॉ. एन. कनगराजन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे जागतिक व भारतातील ज्ञानाचे आदानप्रदान होते आणि आपले ज्ञान अद्ययावत होते. आज भारत अॅनेस्थेशियातील ज्ञानाच्या अनुषंगाने जागतिक मानांकात पश्चिमेच्या देशांच्या बरोबरीत आहे.
नव्या तंत्रामुळे कमी वेदना
बंगरुळू येथील नारायणा हेल्थचे डॉ. के. मुरलीधर यांनी अॅनेस्थेशियालॉजिस्ट डॉक्टरांचे महत्त्व विशद केले. जर्मनी येथील डॉ. एंडर यांनीही भारतीय अॅनेस्थेशिया शास्त्र हे जागतिक तंत्रज्ञानाच्या तोडीचे असल्याचे प्रतिपादन केले. अमेरिकेचे डॉ. चार्ल्स होग म्हणाले की, अॅनेस्थेशिया देण्यासाठी आता जे नवे तंत्र वापरल्या जात आहे, ते कमी वेदनेत अत्यंत क्लिष्ट अशा शस्त्रक्रियांसाठी पुरक आहे.
लहान मुलांवर अॅनेस्थेशियाचा वापर
नवी दिल्ली येथील डॉ. दीपक टेंपे म्हणाले की, नागपूरात देखील अद्ययावत ंअॅनेस्थेशिया आणि वैद्यकीय सुविधेमुळे जागतिक स्तराच्या शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका येथील डॉ. जस्टियन म्हणाले की, लहान मुलांवर अॅनेस्थेशियाचा वापर अत्यंत कठीण असला तरी आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे. युके येथील डॉ. जॉन बेंस यांनी सांगितले की, कमी चिरा व रोबोटिकच्या सहाय्याने हृदयाच्या शल्यक्रिया होत आहेत. आयोजन अध्यक्ष डॉ. एस.के. देशपांडे आणि आयोजन सचिव डॉ विनय कुळकर्णी यांनी आयोजनासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.