... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:18 PM2021-12-30T18:18:19+5:302021-12-30T18:26:02+5:30
राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही.
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. अशात कुणी दारूच्या नशेत गोंधळ घातला, हुल्लडबाजी केली किंवा निर्ढावलेपणा दाखवला तर त्याला नवीन वर्षांचे स्वागत पोलीस कोठडीतून करावे लागेल, असा ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिला. यावेळी सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे उपस्थित होत्या.
थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने जागोजागी पार्टीचे आयोजन केल्या जाते. अतिउत्साहाच्या भरात डीजे लावून नृत्याच्या नावाखाली धिंगाणा केला जातो. गर्दीच्या ठिकाणी महिला-मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाद वाढतात अन् नंतर हाणामारी किंवा प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडतात. दारूच्या नशेत अनेक जण गोंधळ घालतात. सुसाट वेगाने वाहने चालवून स्वतासोबत दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघात घडतात.
सध्या ओमायक्रॉनचा धोका सारखा वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावही झपाट्याने होताना दिसतो आहे. ते लक्षात घेता राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. पोलिसांकडे सेलिब्रेशन पार्टीसाठी ३१ अर्ज आले होते. या सर्वांची परवानगी आम्ही नाकारली आहे, असे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. सुमारे ५ हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार असून, हुल्लडबाजी, रश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांचे मेडिकल करून कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांची तीक्ष्ण नजर
- मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच हॉटेलला (५० टक्के उपस्थिती) परवानगी. मोठ्या हॉटेलमध्ये कुणी लपून पार्टी केली तर गेल्या वर्षी रामदासपेठेतील हॉटेलमध्ये झालेल्या कारवाईपेक्षा कडक कारवाई केली जाईल.
- लपूनछपून पार्टी करणाऱ्यांवर, सोशल मिडियाच्या माध्यमातून पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवरही पोलिसांनी नजर.
- ओपन पार्टीला बंदी. टेरेस, बाल्कनी किंवा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये परवानगी नाही. घरातील सदस्यांसह घरात साजरे करा सेलिब्रेशन.
- शहराच्या सर्व सिमांवर नाकेबंदी. बाहेरून पिऊन आलेल्यांची होणार तपासणी. गार्डन, तलावावर बॅरिकेडस् . उड्डाणपुलावरही बॅरिकेडस्.