मालगाडी रुळावरून घसरली
By admin | Published: March 1, 2017 02:40 AM2017-03-01T02:40:35+5:302017-03-01T02:40:35+5:30
अजनी यार्डातून निघालेली मालगाडी अचानक रुळावरून घसरली. ही घटना आज मंगळवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर : अजनी यार्डातून निघालेली मालगाडी अचानक रुळावरून घसरली. ही घटना आज मंगळवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. मालगाडी मेनलाईनवर येण्याआधीच हा अपघात घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रनगरातील कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया(कॉनकोर)चा इनलँड कंटेनर सोमवारी रात्री अजनी यार्डात पोहोचला.
आज दुपारी हा कंटेनर अजनी यार्डातून निघून मेनलाईनवर येत असताना नरेंद्रनगरजवळ वॅगन क्रमांक २७ चे दोन चाक रुळावरून घसरले. गाडी मेनलाईनवर नसल्याने वाहतूक अवरुद्ध झाली नाही. दोन तासांच्या परिश्रमानंतर गाडी पुन्हा रुळावर आली. दरम्यान, अजनी यार्डातील चार युनिट परत करावे लागले. हा अपघात जर मेनलाईनवर घडला असता तर दिल्ली-मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता होती.(प्रतिनिधी)
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गाडीच्या रुळावरून घसरण्याच्या घटना वाढत आहेत. आता तर मालगाडीचे चाक यार्डातच घसरले. यावरून असे जाणवते की, रेल्वे बोगींच्या देखरेखीत निष्काळजीपणा केला जात आहे.
ही घटना मेनलाईनवर घडली असती तर वाहतूक प्रभावित झाली असती.
या घटनेत चालकाला दोषी धरले जात आहे. पण घटना गाडी मेनलाईनवर येण्याआधी घडली, हे मात्र सोयीस्करपणे लपवले जात आहे.