विमानतळावरील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद
By admin | Published: January 5, 2016 03:17 AM2016-01-05T03:17:27+5:302016-01-05T03:17:27+5:30
पंजाबातील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूर : पंजाबातील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेबाबत मात्र प्रचंड निष्काळजी बाळगली जात आहे. गेल्या महिनाभरापासून एअरपोर्टवरील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद-सुरू होत असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे याबाबत एअरपोर्ट प्राधिकरण गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर दोन स्कॅनिंग मशीन आहेत. एक एअर इंडिया आणि दुसरी खासगी विमानसेवा कंपनीची आहे. गेल्या महिनाभरापासून एअर इंडियाची कार्गो स्कॅनिंग मशीन तांत्रिक खराबीमुळे बंद पडली आहे. याबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एक महिन्यापासून एअरपोर्ट प्राधिकरणची स्कॅनिंग मशीन बंद आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या स्कॅनिंग मशीनची मदत घेतली आहे. अधिक भार वाढल्याने आमचीही स्कॅनिंग मशीन बंद पडली आहे.
एअरपोर्ट प्राधिकरणाचे एक अधिकारी अवधेश प्रसाद यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या स्कॅनिंग मशीनमध्ये कुठलीही अडचण नाही. ती चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. कुणीही कधीही त्याची तपासणी करू शकतो.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नागपूर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर मानले जाते. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरासह नागपुरातही सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत विमानतळावरील स्कॅनिंग मशीन बंद असणे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे. विमानतळावरील अधिकारी सर्वकाही व्यवस्थित असल्याचा दावा करीत असले तरी कुरिअर सेवा प्रभावित झाल्याने त्यांचा दाव्याची पोल उघडकीस आली आहे.