काेराेना संक्रमित रुग्ण वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:47+5:302021-03-05T04:08:47+5:30
बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : केळवद (ता. सावनेर) येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना काेरानाची लागण झाली. सर्व ...
बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : केळवद (ता. सावनेर) येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना काेरानाची लागण झाली. सर्व सदस्य एकाच घरात हाेम क्वारंटाइन आहेत. काहींनी त्यांची नावे साेशल मीडियावर व्हायरल केली. परिणामी, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह आराेग्य विभाग तसेच शेजारी व गावातील इतर नागरिक त्यांच्याशी संपर्क साधायला अथवा मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना लागणारी औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू आणून देणार काेण ? असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. मदतीअभावी त्या कुटुंबीयांना जगणे कठीण हाेत चालले आहे.
या कुटुंबात एकूण ११ सदस्य असून, त्यात तीन पुरुष, तीन महिला व पाच मुली आहेत. हे सर्व सदस्य तीन वर्षे ते ५५ वर्षे वयाेगटांतील आहेत. यांचे तीन भावाचे संयुक्त कुटुंब आहे. काेराेना रुग्णांची नावे गुप्त ठेवली जातात. मात्र, केळवद येथील या कुटुंबीयांची नावे साेशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नातेवाइकांनी फाेनवर संपर्क साधून विचारपूस करायला सुरुवात केली. प्रत्येकाला फाेनवर माहिती देताना नाकीनव आले आहे. या प्रकारामुळे राेज मनस्ताप सहन करावा लागत आहे, असेही कुटुंबप्रमुखाने सांगितले.
पहिल्या दिवशी स्थानिक तलाठ्याचे विचारपूस केली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्याने घराला ‘काेविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र’ असा फलक लावला. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हाेत नाही. फलक बघून दुधवाल्याने दूध देणे बंद केले. त्यामुळे घरातील मुलींना देण्यासाठी दूध आणायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे. महसूल व आराेग्य विभागातील एकाही अधिकाऱ्याने फाेन करून आपल्या आराेग्याची साधी विचारपूस केली नाही. अधिकाऱ्यांना समस्या सांगाव्या तर त्यांचे माेबाइल अथवा दूरध्वनी क्रमांक आपल्याकडे नाही. इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १४ दिवस घराबाहेर पडणे शक्य नसल्याने तसेच या काळात जीवनावश्यक वस्तू न मिळाल्यास आपण जगायचे कसे, असा प्रश्नही कुटुंबप्रमुखाने उपस्थित केला.
...
ही ग्रामपंचायतची जबाबदारी
काेराेना संक्रमित रुग्णांकडे लक्ष देण्याची व त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक संस्थेची अर्थात ग्रामपंचायत प्रशासनाची आहे, अशी माहिती खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली असून, याला तहसीलदार (प्रभारी) चैताली दराडे यांनी दुजाेरा दिला आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना जीवनावश्यक गरजांची पूर्तता करायला पाहिजे, असेही या दाेन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. काेराेना रुग्णांची नावे व्हायरल करू नये, अशी सक्त ताकीद दिल्याची माहिती अनिल नागणे यांनी दिली. मात्र, नावे व्हायरल झाल्यावर प्रशासन कुणावर काय कारवाई करणार, हे मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही.
...
संक्रमित रुग्णांचा मुक्तसंचार
सावनेर तालुक्यात काेराेनाने दुसऱ्या टप्प्यात हातपाय पसरविले असून, तालुक्यात बुधवारी (दि. ३) ५८ काेराेना संक्रमित रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सावनेर शहरातील १६, दहेगाव (रंगारी) येथील १८, खापा शहरातील ८, परसाेडी येथील ३, नागपूर, मंगसा, चनकापूर व वाकोडी येथील प्रत्येकी २ तर पाटणसावंगी, चिचोली (खापरखेडा) चेंब्रिगेट, सावंगी, कोटोडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील काही संक्रमित रुग्णांचा गावात मुक्त संचार सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या रुग्णांमुळे काेराेना संक्रमणात वाढ हाेत असली तरी कुणीही या गंभीर प्रकाराला आळा घालायला तयार नाही.
...