रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची काेराेना चाचणी मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:12+5:302021-06-10T04:07:12+5:30
नागपूर : शासनातर्फे लाॅकडाऊन लावून काेराेना महामारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याअंतर्गत रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ...
नागपूर : शासनातर्फे लाॅकडाऊन लावून काेराेना महामारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याअंतर्गत रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट साेबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या निर्देशांकडे अक्षम्य दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर इतर शहरांमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्टही तपासली जात नसल्याचे आढळून येत आहे. एवढेच नाही तर स्टेशनवर येणाऱ्या बहुतांश प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. काही गिणतीच्या प्रवाशांचीच टेस्ट केली जात असल्याची माहिती समाेर येत आहे.
आकडे बघितले तर दरराेज सरासरी ३००० प्रवाशी विविध गाड्यांनी नागपूर स्टेशनवर येतात. मात्र सुत्राच्या माहितीनुसार मनपा टीमद्वारे नाममात्र २०० लाेकांची तपासणी केली जात आहे. एवढेच नाही तर रेल्वे आणि मनपाच्या टीमद्वारे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट तपासण्याचीही तसदी घेतली जात नाही. राज्य सरकारने गुजरात, राजस्थान, केरळ, गाेवा, उत्तराखंड, दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधून येणाऱ्या प्रवाशांकडून आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट तपासण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. टेस्ट रिपाेर्टविना प्रवास करणाऱ्यांची स्टेशन परिसरात थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. एखाद्या प्रवाशाला काेराेनाचे लक्षणे आढळून आल्यास त्याला रेल्वेच्या आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे साेपविणे गरजेचे असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या टेस्ट रिपाेर्ट्सची तपासणीच केली जात नसल्याचे दिसून येत आहे. असंख्य प्रवाशी आरटीपीसीआर टेस्ट न करताच नागपुरात प्रवेश करीत आहेत. यामुळे या प्रवाशांकडून पुन्हा संक्रमण पसरण्याचा धाेका निर्माण झाला असून या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.