परदेशी पाहुण्यांसाठी गालिचे, राज्यातील साहित्यिक फक्त श्रोते; विश्व मराठी संमेलनावरून नाराजी
By निशांत वानखेडे | Published: January 13, 2024 06:28 PM2024-01-13T18:28:16+5:302024-01-13T18:29:02+5:30
मराठी भाषा विभागाच्यावतीने येत्या २७ ते २९ जानेवारीदरम्यान सिडको नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे.
नागपूर: मराठी भाषा विभागाच्यावतीने येत्या २७ ते २९ जानेवारीदरम्यान सिडको नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या निमंत्रणावरून महाराष्ट्रातील साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विभागातर्फे परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण खर्च दिला असताना राज्यातील साहित्यिकांना कार्यक्रमांची व व्यवस्थेची माहिती न देता केवळ निमंत्रण पाठविल्याने स्व:खर्चाने केवळ श्रोते म्हणून टाळ्या वाजवायला उपस्थित राहावे काय, असा सवाल करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मिळालेल्या निमंत्रणावर तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र राज्याचे मराठी भाषा मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. मराठी भाषा विभागातर्फे त्यांना पवई येथे हाणाऱ्या विश्व मराठी संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणाचा मेल पाठविला आहे. मात्र कोणत्या कार्यक्रमात यायचे, कशासाठी यायचे, याबाबत काहीही माहिती या मेलमध्ये नाही. महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखकांना अशा रीतीने निमंत्रणे देणे हा त्यांचा अवमान आणि अधिक्षेप असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला. अशाप्रकारचे पत्र इतर काही साहित्यिकांना आल्याचे त्यांनी सांगितले.
याउलट परदेशातून येणाऱ्या लोकांना संमेलनात उपस्थित राहण्यासाठी आधीच ७५ हजार रुपये खर्च देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे परेदशातील किमान ५०० पाहुणे संमेलनात आणण्याचा प्रयत्न असल्याने यासाठी ३ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत. म्हणजे परदेशातील लोकांना भारत फिरण्यासाठी कोटींची उधळण करून महाराष्ट्रातील साहित्यिकांशी भेदभाव करून अवमानकारक अशा वातावरणात हे संमेलन घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार झाला होता व यावर्षी देखील या अपमानकारक स्थितीची पुनरावृत्ती केली जात असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला.
संमेलनात उपस्थित राहण्यासाठी प्रवास, निवास, भोजन आदीसाठी किमान ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, तो आम्ही स्वतःच करायचा आहे काय? तसे असल्यास ते देखील स्पष्टपणे कळवायला हवे. मिळालेल्या मेलवर कुठलीच गोष्ट स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कशासाठी नेमके यायचे आहे, कोणत्या कार्यकर्मात सहभाग नियोजित आहे, की केवळ टाळ्या वाजवायला आम्ही उपस्थित राहायचे? केवळ श्रोते म्हणून उपस्थिती नोंदवायला आम्ही यायचे असा याचा अर्थ होतो. - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी