पैसे ग्राहकांचे, जाहिरात मॉल अन् कंपन्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:28 AM2019-04-17T10:28:13+5:302019-04-17T10:32:21+5:30

ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे.

Carry bags and ad of malls and companies | पैसे ग्राहकांचे, जाहिरात मॉल अन् कंपन्यांची

पैसे ग्राहकांचे, जाहिरात मॉल अन् कंपन्यांची

googlenewsNext
ठळक मुद्देप्रिंटेड कॅरी बॅग विकण्याचा मॉल व हॉटेल्सचा नवा फंडाग्राहकांवर अनावश्यक भुर्दंड कशासाठी?हॉटेल्स, सुपर बाजारात थेट ग्राहकांच्या खिशात हातस्वत:च्या ब्रॅण्डिंगसाठी साऱ्यांची दुकानदारीकाही ठिकाणीच मिळतात साध्या बॅग

मोरेश्वर मानापुरे/मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. नागपुरातील काही मॉल, हॉटेल्स, सुपर बाजारात थेट ग्राहकांच्या खिशात हात टाकून दररोज लाखो रुपये वसूल करण्यात येत आहेत. व्यावसायिक प्रतिष्ठानांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन जाहिरातीचा नवीन फंडा सुरू केला आहे.
लोकमतच्या चमूने शहरातील अनेक प्रसिद्ध मॉल्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना भेट दिली असता पेपर कॅरी बॅगच्या माध्यमातून ब्रॅण्डची जाहिरात लोकांकडूनच पैसे घेऊन होताना दिसून आली. काही प्रतिष्ठानांनामध्ये कॅरी बॅगचे पैसे कशाला, अशी विचारणा केली असता वस्तू न्यायची असेल तर कॅरी बॅगसाठी पैसे मोजावेच लागतील, असे सांगण्यात आले.
चमूने पंचशील चौकातील बाटा कंपनीच्या शोरूममधून २९९ रुपयांची चप्पल खरेदी केली. चपलेचा बॉक्स हाती देताना कशी न्यायची अशी विचारणा केली असता कर्मचाºयाने बॅग हवी का, असे विचारले. त्याला हो म्हटल्यावर तीन रुपयाला मिळेल, असे सांगितले. कॅरी बॅगचे बिल मिळेल का, असे विचारले असता, त्याने कागदी बॅगचा उल्लेख करून बिलही दिले. पण त्या कॅरी बॅगवर बाटा कंपनीची जाहिरात प्रिंट होती.
हल्दीरामच्या इतवारी येथील आऊटलेटमधून ४८ रुपयांत ताकाचे सहा पॅकेट विकत घेतले. ते घेऊन जाण्यासाठी कॅरी बॅग मागितली. यासाठी सहा रुपये द्यावे लागले. विशेष म्हणजे तिथे लहान कॅरी बॅग होती. त्यात सहज ताकाचे सहा पॅकेट येत होते. मात्र कर्मचाऱ्याने सहा रुपयांची पेपरची कॅरी बॅग दिली आणि त्याच्यावरही हल्दीरामची जाहिरात होईल, असे प्रिंट केले होते. वेस्ट हायकोर्ट रोडवरील मॅक्स लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रा.लि. येथून एका व्यक्तीने चार हजार रुपयांची खरेदी केली. खरेदी केलेल्या वस्तू नेण्यासाठी आठ रुपयांची पेपर बॅग देण्यात आली. त्या बॅगवर कंपनीचे ब्रॅण्डिंग होईल, असे छापले होते. बिग बाजारच्या रामदासपेठ येथील मॉलमध्ये चमूने पाहणी केली असता खरेदी केलेली वस्तू नेण्यासाठी कापडी पिशवी १५ रुपयात विकण्यात येत होती. यावरही बिग बाजार या ब्रॅण्डची जाहिरात प्रिंट करण्यात आली होती.

येथे आकारत नाहीत कापडी पिशवीच्या मोबदल्यात पैसे
त्याचबरोबर सीताबर्डी येथील श्री शिवम शोरूममधून एका व्यक्तीने कपड्यांची खरेदी केली. पण तिथे दिलेल्या कापडी पिशवीकरिता कुठलेही शुल्क आकारले नाही. त्या पिशवीवर प्रतिष्ठानाचे नाव प्रिंट होते.

कापडी पिशवी व पेपर कॅरी बॅग बंधनकारक नाही
लोकमत चमूने या सर्व प्रतिष्ठानांना भेट दिली असता वस्तू खरेदीनंतर कापडी पिशवी व पेपर कॅरी बॅगची खरेदी बंधनकारक नव्हती. पिशवी आहे का, असे विचारल्यानंतरच त्यांच्याकडून पिशवी पुरविण्यात येत होती. अन्यथा कुठलीही कॅरी बॅग घेणे बंधनकारक नव्हते. ग्राहकांनी वस्तू घरी नेण्यासाठी पिशवी सोबत आणावी, असेही कर्मचाऱ्याने सांगितले.

३ रुपयांच्या पेपर बॅगसाठी बाटा कंपनीला ९ हजारांचा दंड
एका ग्राहकाच्या तक्रारीवर सुनावणी करताना चंदीगड येथील ग्राहक फोरमने रिटेल फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राहकाने ३९९ रुपयांचे जोडे खरेदी केल्यानंतर कंपनीची जाहिरात प्रिंट असलेल्या पेपर बॅगसाठी ३ रुपये अतिरिक्त आकारण्यात आले होते. ग्राहकाने याची तक्रार ग्राहक फोरमकडे केली होती. कंपनी स्वत:च्या प्रचारासाठी ग्राहकाकडून पैसे घेत असल्याचा ग्राहकाचा आरोप होता. फोरमने सुनावणी करताना ९ हजार रुपयांचा दंड ठोठावताना यापुढे वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत कॅरी बॅग देण्याचे आदेश बाटा कंपनीला दिले.

Web Title: Carry bags and ad of malls and companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.