दीपक बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Published: September 27, 2015 02:20 AM2015-09-27T02:20:31+5:302015-09-27T02:20:31+5:30
सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
एसीबीचे धाडसत्र सुरूच : कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी
नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या चौकशीतून बजाज यांच्या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे हाती लागले आहे. त्याचमुळे डॉ. बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी लोकमतला दिली.
सोसायटीच्या माध्यमातून डॉ. दीपक बजाज यांनी अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेतल्याची आणि मोठी मालमत्ता जमविल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात धाड टाकून झडती घेतली. शनिवारीसुद्धा ही झडती सुरूच होती. या झडतीत एसीबीच्या पथकाला १८ लाखांची रोकड, ४८८ ग्राम सोने आणि ५.८५ किलो चांदी सापडली. याशिवाय त्यांच्याकडे ९ वाहने आढळली.
त्यात एक ५५ लाखांची आलिशान कारही आहे. घरातील फर्निचर तसेच अन्य संपत्तीचा हिशेब केल्यास ही मालमत्ता पावणेतीन कोटींच्या घरात असल्याचे एसीबीचे अधिकारी सांगतात.
दरम्यान, बजाज यांनी गैरव्यवहाराशी संबंधित दस्तावेज सिंधू एज्युकेशन सोसायटी परिसर, जरीपटका येथील निवासस्थान प्रिन्सिपल बंगलो, महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, के.सी. बजाज मार्ग जरीपटका येथे लपवून ठेवल्याचा संशय होता. त्यामुळे शनिवारी पाच ठिकाणी एसीबीच्या वेगवेगळ्या पथकाने झडती घेतली. प्रत्येक ठिकाणच्या चौकशीचा अहवाल एसीबीचे अधीक्षक राजीव जैन वेळोवेळी घेत होते. (प्रतिनिधी)
अनेक तक्रारकर्ते पुढे
डॉ. बजाज यांच्या गैरव्यवहारात सोसायटीच्या काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा एसीबीला संशय आहे. त्याचमुळे एका लिपीकाकडेही झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईचा बोभाटा झाल्यामुळे अनेक तक्रारकर्ते पुढे आल्याचे अधीक्षक जैन यांनी सांगितले. नोकरीच्या नावाखाली आमच्याकडून मोठी रक्कम घेतल्याची तक्रार करणारेही काही जण शनिवारी पुढे आल्याचे जैन यांनी सांगितले.