माजी आमदार वारजूरकर यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Published: September 22, 2016 02:55 AM2016-09-22T02:55:19+5:302016-09-22T02:55:19+5:30
माजी आमदार अविनाश वारजूरकर यांच्याविरुद्ध साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप
नागपूर : माजी आमदार अविनाश वारजूरकर यांच्याविरुद्ध साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कैलाश गोलेछा (३७) रा. संभवनाथ अपार्टमेंट, वर्धमाननगर असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. गोलेछा यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे. वारजूरकर यांच्याविरुद्ध सदर येथील एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. भंडारा येथे एका हॉटेलमध्ये वारजूरकर यांनी पिस्तुलच्या धाकावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. खूप उशिरा तिने ही तक्रार दाखल केली. भंडारा पोलिसांनी २७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात गोलेछा हे साक्षीदार आहेत. तर वारजूरकर यांना न्यायालयातून जामीन मिळालेला आहे.
गोलेछा यांच्या तक्रारीनुसार बलात्काराची तक्रार दाखल झाल्यापासून वारजूरकर त्यांना धमकावत आहे. वारजूरकर यांनी गोलेछाला फोनवर मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरी जाऊन फिर्यादीच्या पत्नीलाही धमकावले व आपल्या पतीला समजावण्यास सांगितले. सातत्याने धमकावले जात असल्याने अखेर गोलेछा यानी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी धमकावणे व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)