उपवास विषबाधा प्रकरणात सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा
By योगेश पांडे | Published: March 12, 2024 12:04 AM2024-03-12T00:04:19+5:302024-03-12T00:05:55+5:30
हिंगणा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नागपूर : महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पिठापासून तयार केलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने शहरातील विविध भागात शंभरहून अधिक नागरिकांची प्रकृती खराब झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रेडिमेड भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्यपदार्थ खाऊन, तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात जणांची प्रकृती खराब झाली व त्यांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांनी हिंगण्यातील गोपाळ हॉटेल व गुरुकृपा किराणा स्टोअर्स येथून शिंगाड्याच्या शेवेचे पाकिटं विकत घेतले होते. पोलिसांनी रुग्ण व दुकानदारांचे बयाण घेतले, तसेच तो माल तपासणीसाठी पाठविला. पोलिसांनी सरोज नमकीन कंपनीचे मालक व वितरक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.