बाजीराव वाघाचे अवयव चोरी प्रकरणी डॉक्टर कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:46 PM2018-03-16T23:46:21+5:302018-03-16T23:46:41+5:30
महाराराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे.
सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये बाजीराव वाघाच्या शवविच्छेदनादरम्यान डॉ. बाविस्कर यांनी वाघाच्या अवयवाचे नमुने चोरल्याचा आरोप मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजही हाते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. परंतु तूर्तास तरी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, या पूर्वीही डॉ. बाविस्कर यांनी परवानगी न घेता खापा वन क्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या वाघिणीचा पाय कापून संशोधनासाठी घेऊन जाण्याचे प्रयत्न केल्याची लेखी तक्रारही हाते यांनी केली होती.
सूत्रानुसार, प्राधिकरणाची बुधवार १४ मार्च रोजी व्हेटरनरी डॉक्टराच्या तात्पुरत्या नियुक्तीवर बैठक झाली. यात काही वन अधिकाऱ्यांनी डॉ. बाविस्कर यांच्यावर असलेल्या आरोपांना घेऊन त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यावर आक्षेप घेतला. बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुख्य वनसंरक्षक एस.एस. डोले, डीएफओ एस. बी. भलावी, डीएफओ कमलाकर धामगे, एलडीओ मनिषा पुंडलिक आणि नागपूरचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुनचे प्रतिनिधी एसीएफ विशाल बोराडे आदि उपस्थित होते.