तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:31+5:302021-09-16T04:12:31+5:30
माजी नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल दोन्ही पक्षांचे एकमेकांविरोधात आरोप वाडी: दत्तवाडीच्या शिवशक्तीनगरमध्ये तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाडी ...
माजी नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल
दोन्ही पक्षांचे एकमेकांविरोधात आरोप
वाडी: दत्तवाडीच्या शिवशक्तीनगरमध्ये तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी माजी नगरसेविका, तिचे पती व मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण जितेंद्र डोरले (१७) रा. प्लॉट नं. १२, शिवशक्ती हा १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान दुकानात बिस्कीट आणायला जात असताना, सरिता यादव, त्यांचे पती व मोठ्या मुलीने त्यांच्या लहान मुलीसोबत फोनवर बोलतो, या कारणावरून करण याला शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. करण याने याबाबतची माहिती त्याच्या आईला दिली. यावर त्याच्या आईने जाब विचारण्यासाठी यादव यांचे घर गाठले असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचे करण याने तक्रारीत म्हटले आहे. करणचे वडील मुजफ्फरपूर येथे सीआरपीएफमध्ये नोकरी करतात. तो त्याच्या आईसोबत राहतो. त्याने घडलेल्या प्रकारची माहिती वडिलांना देऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर, १३ सप्टेंबरला वाडी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी भादंवि कलम २९४, ३२३, ५०६ (ब), ३४ नुसार उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
---
संबंधित तरुण हा टपोरी आहे. माझ्या अल्पवयीन छोट्या मुलीला विनाकारण दोन महिन्यांपासून फोन करीत होता. त्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रकारही सुरू केला असल्याने, मी व माझ्या मोठ्या मुलीने त्याला घरी बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला. असा प्रकार पुढे व्हायला नको, असे कडक भाषेत सांगितले असता, त्याने उलट उत्तरे देत, उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. यातच मी त्याच्या कानशिलात लावली. एवढ्यात माझे पती आले व त्यांनीही त्याला दाटले. आम्ही तिघेच घरी होतो. माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हेतुपुरस्सर माझ्या परिवाराची बदनामी करण्याचा प्रकार घडत आहे.
- सरिता यादव, माजी नगरसेविका, वाडी.