कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन, चंद्रशेखर बावनकुळेंसह ३० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 10:23 AM2022-01-21T10:23:46+5:302022-01-21T10:34:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी कोराडी येथे कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले होते.
नागपूर : कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या ३० कार्यकर्त्यांवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी कोराडी येथे कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना कोविड नियमांचे उल्लंघन करू नये, अशी समजही दिली होती. गुरुवारी याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार कृष्णा खोपडे देखील कोरोना पॉझिटिव्ह असताना आंदोलनात कसे सहभागी झाले, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. महापालिकेने खोपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर दुसरीकडं बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून भाजपची मुस्कटदाबी सुरू केली आहे.