होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक; सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 05:37 PM2022-10-13T17:37:20+5:302022-10-13T17:39:11+5:30

पीएमओत ओळखी असल्याचे दाखवत फसवणूक

case filed against social media analyst Ajit Parse for defrauding a homeopathy doctor of 4.5 crores | होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक; सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेविरुद्ध गुन्हा

होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक; सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

नागपूर : बडकस चौकातील एका होमिओपॅथी डॉक्टरची साडेचार कोटींनी फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात विविध संस्थांचे सोशल मीडियाचे काम सांभाळणाऱ्या अजित पारसे (४२) याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बडकस चौकात डॉ.राजेश मुरकुटे (४८) यांचे होमिओपॅथी क्लिनिक आहे. २०१९ साली हेमंत जांभेकर यांच्या माध्यमातून मुरकुटे यांची पारसेशी ओळख झाली. डॉ. मुरकुटे यांना नवीन होमिओपॅथी कॉलेज सुरू करायचे होते. त्यासंदर्भात त्यांनी पारसेसोबत चर्चा केली. महाविद्यालय सुरू करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करावी लागेल असे पारसेने त्यांना सांगितले. त्यानंतर यश ग्लोबल ट्रेडलिंक नावाची कंपनी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्या कंपनीला सीएसआरचा निधी मिळवून देतो असा दावा पारसेने केला व डॉ. मुरकुटे यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर त्याने पीएमओच्या एका तथाकथित अधिकाऱ्याशी व्हॉट्सअपवर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट्स मुरकुटे यांना पाठविले.

२१ जुलै २०२० रोजी मुरकुटे यांनी २५ लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी पारसेने त्यांना विविध कामासाठी पैसे मागितले व डॉ. मुरकुटे यांनी पैसे पाठविले. डॉक्टर आर्थिक प्रकरणात हमीदार होते. याप्रकरणी सीबीआयने सुरू केलेल्या तपासाबाबत पारसे यांनी सांगितले. सीबीआयचा वॉरंट मागे घेण्याच्या मोबदल्यात दीड कोटी रुपये घेतले. नंतर डॉक्टरांना बनावट ‘क्लोजर’ रिपोर्टही पाठवण्यात आला. अल्पवयीन मुलीला डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतले होते. दोन दिवसांनी मुलाच्या दत्तक प्रकरणाची चौकशी सुरू होईल, असे पारसेने सांगितले.

डॉ. मुरकुटे यांच्या तक्रारीनुसार त्यातदेखील पारसेने पैशांची मागणी केली. डॉ. मुरकुटे यांनी या कालावधीत एकूण साडेचार कोटी रुपये दिले. अखेर त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे निर्देश दिले. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्हा दाखल केला. पारसेच्या घराचीदेखील तपासणी करण्यात आली.

आजारी असल्यामुळे दवाखान्यात दाखल

पारसेच्या घराची तपासणी केली असता तेथे काही मंत्री, पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नावाचे लेटरहेड व स्टॅम्पपेपर सापडले. काही दिवसांपासून पारसे आजारी असल्याने दवाखान्यात दाखल आहे. त्यामुळे पोलिसांनी पारसेची चौकशी केलेली नाही.

उच्चशिक्षित असूनदेखील चाचपणी का नाही ?

या प्रकरणात डॉ. मुरकुटे विविध कारणांसाठी पारसेला दर वेळी पैसे देत गेले. मात्र, त्यांनी त्यांना मिळालेले दस्तावेज, वॉरंट इत्यादींची स्वत: चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. याशिवाय सीएसआर फंड, महाविद्यालय स्थापनेच्या इतर प्रक्रियेचीदेखील चाचपणी केली नाही. उच्चशिक्षित असूनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका त्यांना बसला.

Web Title: case filed against social media analyst Ajit Parse for defrauding a homeopathy doctor of 4.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.