नागपुरातील नगरसेवक बंटी शेळकेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:41 AM2019-12-05T10:41:46+5:302019-12-05T10:42:13+5:30
विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे नगरसेवक व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी मोंटू नीलेश मुरकुटे (२८) रा. दसरा रोड, महाल याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे नगरसेवक व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी मोंटू नीलेश मुरकुटे (२८) रा. दसरा रोड, महाल याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री दसरा रोड भागात घडली. मोंटू याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी बंटी शेळके याचे विरुद्ध शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोंटी, रजत दुर्गे, तुषार, निखील ढोके, अजिंक्य उचके, अक्षय कातुरे हे मंगळवारी रात्री घराजवळ बसले होते. यावेळी बंटी शेळके व त्याचे पाच साथीदार तेथे आले. निवडणुकीत मदत न केल्याने पराभूत झाल्याचा आरोप करीत बंटी शेळके व त्याच्या साथीदारांनी मोंटू याला मारहाण केली. त्यानंतर मोंटू हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला. यावेळी बंटी शेळकेचा भाऊ तेथे आला. तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी त्याने दिली. बंटी व त्याचे साथीदार दारू पिऊन होते, असा आरोप मोंटुने केला आहे तर मोंटु हा दारू पिऊन परिसरातील नागरिकांना त्रास देतो. त्यामुळे त्याची समजूत काढण्यासाठी गेलो होतो. त्याला मारहाण केली नाही. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येत असल्याचा दावा बंटी शेळके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
बंटी शेळकेमुळे जीवितास धोका
निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आकसापोटी बंटी शेळकेने आपल्यावर हल्ला केला असून माझ्यासह मित्रांना बेदम मारहाण केल्याची माहिती मोंटी मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकीय पदाचा दुरुपयोग करून शहरातील शांती भंग करणाऱ्या बंटी शेळकेविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करून त्यास शहरातून हद्दपार करावे, अशी मागणी मुरकुटे यांनी केली.