सुनील मिश्राविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:10 PM2018-05-25T22:10:51+5:302018-05-25T22:11:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच, मिश्रा यांच्याशी संबंधित विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच, मिश्रा यांच्याशी संबंधित विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली.
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या निर्देशानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी व उपकुलसचिव अनिल हिरेखण यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली. पोलिसांनी त्याला दुजोरा दिला. तसेच, प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगितले. परंतु, या विषयावर विद्यापीठातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. डॉ. खटी यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तक्रारीला एका अहवालाची प्रतही जोडण्यात आली आहे. त्या अहवालात मिश्रा यांच्यावरील विविध आरोपांचा उल्लेख आहे.
चौकशी समितीमध्ये केशव मेंढे व उपकुलसचिव प्रदीप मसराम यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करणार आहे. मिश्रा यांनी ट्रॅव्हल्स अॅन्ड टुरिजम स्नातकोत्तर पदविका व एलएल.बी. अभ्यासक्रमाची गुणपत्रिका परत का केली याच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनमधील शिष्यवृत्ती अनियमिततेचा तपास करण्यात येणार आहे.