नगरसेवक बंटी शेळकेंविरुद्ध सदर ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:07 PM2021-04-29T23:07:16+5:302021-04-29T23:08:34+5:30

corporator Bunty Shelke booked खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करून विभागीय आयुक्त तसेच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या नावे शिमगा करून त्यांना जाळण्याची धमकी देणारे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे लकडगंज पोलिसांनीही त्यांना नोटीस बजावली आहे.

A case has been registered against corporator Bunty Shelke | नगरसेवक बंटी शेळकेंविरुद्ध सदर ठाण्यात गुन्हा दाखल

नगरसेवक बंटी शेळकेंविरुद्ध सदर ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी : लकडगंज पोलिसांनीही बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करून विभागीय आयुक्त तसेच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या नावे शिमगा करून त्यांना जाळण्याची धमकी देणारे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे लकडगंज पोलिसांनीही त्यांना नोटीस बजावली आहे.

उपचाराच्या नावाखाली कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांकडून लाखो रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि ऑडिटर मूकदर्शक बनलेले आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात बुधवारी एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी आ. विकास ठाकरे, अभिजित वंजारी तसेच नगरसेवक बंटी शेळकेसुद्धा उपस्थित होते. चर्चेदरम्यान अचानक नगरसेवक शेळके संतप्त झाले. त्यांनी तेथे आरडाओरड सुरू केली. कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा करताना त्यांना जाळून टाकण्याची भाषा वापरली. दरम्यान, नाना पटोले यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शेळकेंविरुद्ध धमकी देऊन आरडाओरड केल्याच्या आरोपाखाली जामीनपात्र गुन्हा दाखल केला. शेळके यांनी आंबेडकर चौकातील एका खाजगी इस्पितळाची तक्रार करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांसह विभागीय आयुक्त कार्यालय गाठले होते. तेथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते संतप्त झाल्याचे समजते. या संबंधाने लकडगंज पोलिसांनीसुद्धा शेळके यांना नोटीस बजावली असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वीही गुन्हे दाखल

आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्यासाठी नगरसेवक शेळके परिचित आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, हे विशेष!

Web Title: A case has been registered against corporator Bunty Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.