अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी, चिमुकलीला विकत घेणा-या दाम्पत्याविरुद्धही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 08:59 PM2017-12-09T20:59:20+5:302017-12-09T20:59:42+5:30
कायदेशिर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकली विकत घेणे एका सुशिक्षीत दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्य सुखासाठी आसुलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नागपूर - कायदेशिर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकली विकत घेणे एका सुशिक्षीत दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्य सुखासाठी आसुलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
अमरावती मार्गावर राहणारा आणि मोलमजूरी करणारा अविनाश बारसागडे याची पत्नी मोना हिने २२ डिसेंबरला मेडिकलमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. तिच्या जन्माला येणा-या अपत्यावर आठ महिन्यांपासून नजर ठेवून असलेल्या भारती नामक महिला दलाल तसेच हर्षा आणि मनीष मुंधडा या दाम्पत्याने दुस-याच दिवशी मोनाच्या कुशितून तिच्या नवजात चिमुकलीला ताब्यात घेतले आणि तिच्या हातात थोडीशी रक्कम कोंबून तिला गप्प केले.
दुसरीकडे गेल्या १८ वर्षांपासून अपत्य सुखासाठी आसुसलेले सोनेगावचे एक सुशिक्षीत दाम्पत्य आरोपी मुंधडा दाम्पत्याच्या संपर्कात होते. सरोगसी सेंटर चालविण्याचा बनाव करणा-या मुंधडा दाम्पत्याने सोनेगावच्या या अभियंत्याला त्याच्या पत्नीसह आधीच बाळ देण्याचा सौदा पक्का केला होता. या दाम्पत्याच्या भावनिक विवशतेचा गैरफायदा घेत त्यांना मोना आणि अविनाश बारसागडेची चिमुकली दिली.
त्याबदल्यात त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये घेतले. अनेक वर्षांनंतर अपत्य सुख मिळाल्याने अभियंता आणि त्याच्या पत्नीने चिमुकलीला घरी नेले. अवघ्या १२ दिवसातच ही चिमुकली त्यांच्या काळजाचा तुकडा बनली. तिच्यासह भविष्याच्या वेगवेगळळ्या कल्पना रंगविणा-या या दाम्पत्याला गुरुवारी ७ नोव्हेंबरला जबर मानसिक धक्का बसला. मुंधडा दाम्पत्याने सरोगसीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून त्यांना ही चिमुकली विकल्याचे स्पष्ट झाले.
धंतोली पोलिसांनी या प्रकरणी मुंधडा दाम्पत्याला अटक केल्याचेही वृत्तपत्रातून त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून चिमुकलीला धंतोल पोलिसांच्या माध्यमातून मोनाला सोपविले. दरम्यान, चिमुकलीच्या खरेदी विक्री प्रकरणात तांत्रिकदृष्टया अभियंता आणि त्याची पत्नी हे देखिल आरोपी बनत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर या दाम्पत्यापैकी अभियंत्याला अटक केली.
भावनिक कालवाकालव
कुणालाही न दुखावत, कोणतीही इजा न करता अथवा कुणाचीही फसवणूक करता सोनेगावच्या दाम्पत्याने चिमुकलीला आपल्या घरी नेले. त्यासाठी सव्वादोन लाखांची रक्कमही मोजली. आपण आईवडील झालो, या आनंदात मुलीला घरी नेताना या दाम्पत्याने कायदेशिर बाबी तपासल्या नाही. तेथेच त्यांची गल्लत झाली. मुंधडा दाम्पत्याने त्यांची भावनिक आणि आर्थिक फसवणूक केली. एवढेच नव्हे तर त्यांना स्वत:सोबत आरोपी म्हणून एका गंभीर प्रकरणातही गोवले. चिमुकलीला घरी नेणा-या या दाम्पत्याचा काही दोष नाही, हे पोलिसांनाही माहित आहे. मात्र, कायद्यानुसार, ते मुलीच्या खरेदी-विक्री प्रकरणात सहभागी आहेत. त्यामुळे भावनिक कोंडी झुगारत पोलिसांनी आरोपी म्हणून अभियंत्याला अटक केली आहे.
फर्स्ट सरोगसी मदर
ब-याच वर्षांनंतर अपत्य सुख मिळाले आणि अवघ्या १२ दिवसातच ते हिरावले गेले. आरोपी म्हणून आता पोलिसांच्या कोठडीतही पोहचावे लागल्याने सोनेगावच्या दाम्पत्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. विशेष म्हणजे, सोनेगावच्या दाम्पत्याच्या वाट्याला ही वाईट अवस्था आणण्यास कारणीभूत असलेली आरोपी मनीष मुंधडाची पत्नी नागपुरातील पहिली सरोगसी मदर असल्याचे धंतोली पोलीस सांगतात. त्यांच्यासाठी दलाल म्हणून काम करणारी भारती अद्याप फरारच आहे. मुंधडा दाम्पत्याच्या सेंटरला कोणतीही शासकीय मान्यता नसताना त्यांना मोठमोठ्या ईस्पितळातील डॉक्टर कसे मदत करीत होते, असा प्रश्न आहे. नवजात बालकांच्या खरेदी विक्री प्रकरणात काही डॉक्टरांचाही सहभाग असल्याची चर्चा असून, पोलीस त्यांचाही तपास करीत आहे, असे द्वितीय पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.