स्विमींग पूलमधील मृत्यू प्रकरणात ‘हॉटेल प्राईड’च्या महाव्यवस्थापकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: September 18, 2023 03:36 PM2023-09-18T15:36:00+5:302023-09-18T15:36:41+5:30

ट्रेनरकडे अधिकृत प्रमाणपत्रच नव्हते, तरीदेखील हॉटेलकडून नियुक्ती : सुरक्षेची उपकरणेदेखील गायब असल्याचा ठपका

case has been registered against four people including the general manager of hotel pride in the case of death in the swimming pool | स्विमींग पूलमधील मृत्यू प्रकरणात ‘हॉटेल प्राईड’च्या महाव्यवस्थापकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

स्विमींग पूलमधील मृत्यू प्रकरणात ‘हॉटेल प्राईड’च्या महाव्यवस्थापकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हॉटेल प्राईडमधील स्विमींग पूलमध्ये पोहत असताना एका व्यापाऱ्याचा जुलै महिन्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात सोनेगाव पोलीस ठाण्यात हॉटेलच्या महाव्यवस्थापकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या स्विमींग ट्रेनरकडे अधिकृत प्रमाणपत्र नसतानादेखील त्याची नियुक्ती करण्यात आली होती व तेथे सुरक्षेची उपकरणेदेखील नव्हती.

सुशांत मधुसुदन धोपटे (५१, मेघरे ले आउट, मनीषनगर) असे मृताचे नाव आहे. ते मुलगा शौर्य (१२) व मुलगी शगुन (१७) यांच्यासह दोन महिन्यांपासून हॉटेल प्राइड येथील स्वीमिंग टॅंकमध्ये पोहण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे ते ४ जुलै रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोहायला गेले. नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता स्वीमिंग क्लास संपल्यानंतर प्रशिक्षकाने निघण्याची इच्छा व्यक्त केली व तो कपडे बदलायला गेला. त्यावेळी धोपटे, त्यांची मुलगी शगुन आणि एक डॉक्टर टॅंकमध्येच होते. टॅंकच्या एका टोकाला शगुन आणि डॉक्टर पोहायला लागले तर धोपटे दुसऱ्या टोकाला पोहायला लागले. दरम्यान, पोहत असताना धोपटे यांना चक्कर आली व ते पाण्यात बुडाले. दुसऱ्या टोकाला असल्याने शगुन आणि डॉक्टरांना याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, प्रशिक्षक कपडे बदलून परतल्यावर धोपटे दिसत नसल्यामुळे त्याने शगुनला विचारले. शगुन हाताने इशारा करत 'आम्ही इथेच पोहत होतो', असे सांगितले. प्रशिक्षकाने टॅंकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले.

या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र चौकशीदरम्यान धोपटे यांनी स्विमींगसाठी मेंबरशीप घेतल्याचे दिसून आले. पुलमध्ये जाणाऱ्या मेंबरसाठी प्रशिक्षक व जीवनरक्षक असणे आवश्यक असते. तसेच प्रशिक्षकाकडे अधिकृत प्रमाणपत्र गरजेचे असते. मात्र अक्षय मधुकरराव चतुरकर (२८) याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. तरीदेखील त्याला प्राईट हॉटेलचे महाव्यवस्थापक सुजीतकुमार सिंह, एचआर व्यवस्थापक अमोल सदाशिवराव कोकाटे (३९) व अनुराग राजेंद्र गुर्जर (३३) यांनी कामावर ठेवले. तसेच स्विमींग पूलजवळ जीव वाचविण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणेदेखील ठेवली नव्हती. या चारही आरोपींच्या निष्काळजीपणामुळे धोपटे यांचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: case has been registered against four people including the general manager of hotel pride in the case of death in the swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.