‘तुली’मध्ये राडा करणाऱ्या मोहब्बत सिंगांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:43+5:302021-07-31T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हॉटेल तुली इम्पेरिअलमध्ये गुरुवारी सकाळी साथीदार घेऊन येत राडा करणारे बहुचर्चित व्यावसायिक मोहब्बत सिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल तुली इम्पेरिअलमध्ये गुरुवारी सकाळी साथीदार घेऊन येत राडा करणारे बहुचर्चित व्यावसायिक मोहब्बत सिंग तुली आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
हॉटेल तसेच वाहतूक व्यवसायातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे मोहब्बतसिंग तुली यांच्या परिवारात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मालमत्तेवरून वाद सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबात एकूण पाच भाऊ आहेत. आपसी वाद टोकाला गेल्याने त्यांच्या परस्परांविरुद्ध अनेकदा पोलीस तक्रारी झाल्या आहेत. प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने काही दिवसांपूर्वी ऑर्बिट्रेटरही नेमण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून वाद निकाली काढण्यासाठी त्यांच्यात बैठका सुरू होत्या. तीन दिवसांपूर्वी ऑर्बिट्रेटरसोबत झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली असतानाच गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हॉटेल तुली इम्पेरिअलमध्ये मोहब्बत सिंग तुली अनवर आणि दुसरा एक साथीदार घेऊन आले. ते जबरदस्तीने एका रूममध्ये शिरले. तेथे त्यांनी ऑर्बिट्रेटरच्या सहायकाकडून काही कागदपत्रे हिसकावून घेतली. विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर भागीदारही तेथे पोहोचले. त्यानंतर वाद अधिकच चिघळला. गुरुवारी रात्री हॉटेल व्यवस्थापनातर्फे आकाश शर्मा यांनी पोलीस ठाण्यात मोहब्बत सिंग तुली आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये येऊन शिवीगाळ केली. मारहाण करून धमकी दिली आणि मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून नेल्याची तक्रार दिली. आपसी वादाचे हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चाैकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारे शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
----
तक्रारीतील आरोप अन् गुन्ह्याचे कलम
जबरदस्ती प्रवेश करून मारहाण करणे (कलम ४५२), प्रतिबंध करणे (कलम ३४१), हातबुक्कीने मारहाण करणे (कलम ३२३), शिवीगाळ करणे (५०४), जिवे मारण्याची धमकी देणे (५०६), वाईट हेतूने मालमत्ता हिसकावून नेणे (४०३), गैरमार्गाचा अवलंब करणे (कलम २०४) आणि कलम ३४ (एकापेक्षा जास्त आरोपी)
आरोप