विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी करणाऱ्या केदारांवर गुन्हा दाखल
By जितेंद्र ढवळे | Published: January 11, 2024 07:33 AM2024-01-11T07:33:04+5:302024-01-11T07:34:23+5:30
जामीन रद्द करण्याचीही तयारी : समर्थकांवर कारवाई होणार.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत वाहतुकीत अडथळा आणल्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर बुधवारी रात्री धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याआधारे पोलिस केदारांचा जामीन रद्द करण्याची तयारी करीत आहेत.
केदारांसह पोलिसांनी जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, रवींद्र चिखले, जि.प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि. प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम आणि विष्णू कोकड्डे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे केदार यांना विविध कडक अटींसह हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास केदार कारागृहातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी समर्थकांसह शहरात शक्तिप्रदर्शन केले. त्यांची रॅली वर्धा रोड मार्गे रहाटे कॉलनी चौकातून शहीद गोवारी उड्डाणपुलावरून संविधान चौकात पोहोचली. मात्र या रॅलीचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. केदार आणि समर्थकांच्या गाड्यांच्या ताफ्यामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
केदार यांना जामीन मिळताच केदार समर्थकांना कारागृहासमोर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदर्भातील संदेश सोशल मीडियावर पाहताच धंतोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे आणि केदार यांच्या अन्य समर्थकांना सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस बजावली होती. नागपूर कारागृहात दहशतवादी, नक्षलवादी आणि इतर संवेदनशील कैदी असल्याने सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना कारागृहासमोर जमण्यास, घोषणाबाजी करण्यास, रॅली काढण्यास मनाई केली होती. असे असतानाही केदार समर्थक कारागृहासमोर जमले होते. केदार यांच्या सुटकेनंतर कारागृहातून दुपारी दोन वाजता खुल्या गाडीतून रॅली काढण्यात आली.
५० पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात दाखल झालेल्या केदार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी रॅली रोखून घोषणाबाजी करत वाहतूक विस्कळीत केली. कारागृहातून संविधान चौकात पोहोचत असताना वर्धा रोडवर सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर धंतोली पोलिसांकडून भा.दं.सं चे कलम ३४१, १४३, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५, मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यांची ही कारवाई नियमांचे उल्लंघन असल्याचे पोलिसांचे मत आहे. अशा परिस्थितीत जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
रॅलीतील वाहने जप्त होणार
रॅलीत ५० हून अधिक वाहने सहभागी झाली होती. पोलिसांना अनेक वाहनांचे क्रमांक मिळाले आहेत. त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या रॅलीत रेती माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही सहभागी झाले होते. त्यांचीही माहिती पोलिस गोळा करीत आहेत.