ऐकावं ते नवलच! ४० रुपये लुटण्याचे प्रकरण चक्क ४२ वर्षे लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 11:03 AM2021-10-25T11:03:45+5:302021-10-25T13:53:48+5:30
एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून ४० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल ४२ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं.
नागपूर : ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. चाकू भोसकून ४० रुपये लुटण्याचे एक प्रकरण विविध कारणामुळे तब्बल ४२ वर्षे लांबले. दरम्यान, चारपैकी तीन आरोपी व सातपैकी चार सरकारी साक्षीदारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी निकाली निघाले असून वाचलेल्या आरोपीला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष सोडण्यात आले आहे.
भीमराव राजाराम नितनवरे असे वाचलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आता ६५ वर्षे वयाचा आहे. तो आतापर्यंत जामिनावर बाहेर होता. इतर आरोपींमध्ये रमेश मेश्राम, मधुकर पाटील व हिरामण ढोके यांचा समावेश होता. ही घटना १३ जानेवारी १९७८ रोजी हिंगणा रोडवर घडली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी रमेश मेश्रामला अटक करण्यात यश मिळविले, पण इतर आरोपी फरार होते. दरम्यान, पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काही वर्षांनंतर फरार आरोपी मधुकर पाटील व हिरामण ढोकेचा मृत्यू झाल्याचे कळले.
पुढे भीमराव नितनवरे पोलिसांना सापडला. त्यानंतर आरोपी रमेश मरण पावला. अशा विविध कारणांनी हे प्रकरण लांबत गेले. दरम्यान, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नितनवरेविरुद्ध खटला चालविण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. सत्र न्यायालयाने अडीच वर्षांमध्ये हा खटला निकाली काढला. आरोपीच्या वतीने ॲड. अमित बंड यांनी कामकाज पाहिले.
अशी घडली घटना
फिर्यादी मोतीराम गेडाम घटनेच्या दिवसी रात्री १२ च्या सुमारास घरी जात असताना आरोपींनी त्याला अडवले, तसेच त्याला चाकूने जखमी करून त्याच्याकडील ४० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी पळून गेले, अशी पोलीस तक्रार होती.