अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी सक्तमजुरी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 05:19 AM2018-07-16T05:19:23+5:302018-07-16T05:20:50+5:30
अल्पवयीनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली.
नागपूर : अल्पवयीनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. आरोपीचे अपील फेटाळून लावत न्या. मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.
विशाल सिद्धार्थ मेंढे (३७) असे आरोपीचे नाव असून तो कोपरा, ता. सेलू येथील रहिवासी आहे. जिल्ह्यातील बोरी येथील मयत बालिका घटनेच्या वेळी १४ वर्षे वयाची होती. आरोपी एकतर्फी प्रेमातून तिचा मानसिक छळ करीत होता. ३ एप्रिल २०११ रोजी आरोपीने मुलीच्या आईला प्रवीण चाफले नावाने फोन केला आणि तिच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. तसेच मुलीला घरी येऊन धमकी दिली. या प्रकारामुळे प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन मुलीने ४ एप्रिल २०११ रोजी जाळून घेतले. ११ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाबात तिने आरोपीमुळे आत्महत्या केल्याचे सांगितले.