व्हेंटिलेटरअभावी युवतीचा मृत्यू प्रकरण; वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही मेडिकलची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 04:04 PM2022-09-19T16:04:31+5:302022-09-19T16:12:01+5:30
संचालक डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा
नागपूर : मेडिकलमध्ये व्हेंटिलेटरअभावी ‘अंबू बॅग’वर असलेल्या १७ वर्षीय युवतीच्या मृत्यू प्रकरणाची दखल वैद्यकीय शिक्षण विभागालाही घ्यावी लागली. विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी रविवारी मेडिकलला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली, तसेच व्हेंटिलेटरचाही आढावा घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर (वय १७) हिच्यावर मेडिकलच्या वॉर्ड क्र. ४८ मध्ये उपचार सुरू असताना व्हेंटिलेटरची गरज पडली; परंतु वेळेवर हे यंत्र उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे तिला तात्पुरती सोय म्हणून ‘सेल्फ-इन्फ्लेटिंग बॅग’वर (अंबू बॅग) ठेवण्यात आले; परंतु २४ तासांपेक्षा जास्त तास उलटूनही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने तिने ‘अंबू बॅग’वरच शेवटचा श्वास घेतला. ‘लोकमत’ने १७ सप्टेंबरचा अंकात ‘व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय युवतीचा मृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यामुळे दुसऱ्याच दिवशी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले. पाच सदस्यांची चौकशी समिती पुढील दोन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. या वृत्ताची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनीही घेतली. रविवार सुटीचा दिवस असतानाही मेडिकलला भेट दिली. सुत्रानूसार, त्यांनी वॉर्ड क्र. ४८सह अतिदक्षता विभाग व मेडिसिन वॉर्डाची पाहणी केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांच्यासह मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याची माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉ. म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
- वैष्णवीला वाहिली आदरांजली
सेवा फाऊंडेशनच्यावतीने रविवारी सायंकाळी मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येऊन मेणबत्ती प्रज्वलित करून वैष्णवीला आदरांजली वाहिली. यावेळी मेडिकलमधील गैरसोयींवरही प्रकाश टाकला. सोयींच्या अभावी कॅन्सर रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंतही काहींनी यावेळी बोलून दाखवली.