निकिताची हत्या नसून आत्महत्या.. मित्राकडून मागवले होते डिझेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 10:24 AM2022-03-19T10:24:32+5:302022-03-19T10:55:12+5:30
बुधवारी सायंकाळी २२ वर्षांच्या निकिता चौधरीचा मृतदेह सुराबर्डीत जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
नागपूर : अमरावती मार्गावर सुराबर्डीत युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस आत्महत्येची शंका व्यक्त करीत आहेत. प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पोलिसांनी मृत निकिता चौधरीचा बॉयफ्रेंडशी वाद झाल्यामुळे ती मानसिक तणावात असल्याचे सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर खरी घटना उघडकीस येऊ शकणार आहे.
बुधवारी सायंकाळी २२ वर्षांच्या निकिता चौधरीचा मृतदेह सुराबर्डीत जळालेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाची अवस्था पाहून निकिताचा खून केल्याचे दिसत होते. त्यानंतर पोलीस सीसीटीव्ही, मोबाइलची तपासणी तसेच कुटुंबीयांची चौकशी करून सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. निकिताची राहुल नावाच्या युवकाशी मैत्री आहे. दोघे लग्नही करणार होते.
काही दिवसांपासून राहुल निकिताला त्रस्त करीत होता. मारहाण करून शिवीगाळ करीत होता. त्याच्या वागणुकीमुळे निकिता दुखी होती. तिने आपल्या मैत्रिणीला राहुलपासून त्रस्त झाल्याचे सांगितले होते. आपले आयुष्य संपविण्याची इच्छाही तिने मैत्रिणीजवळ व्यक्त केली होती. मैत्रिणीशी व्हॉट्सॲपवर झालेली बातचीतही पोलिसांच्या हाती लागली आहे. कुटुंबीयही राहुलच्या वागणुकीमुळे निकिता मानसिक तणावात होती, असे सांगत आहेत.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता कार्यालयातून रवाना झाल्यानंतर निकिता अक्षय नावाच्या मित्राला भेटली. निकिताने अक्षयला होळीला स्टोव्हसाठी केरोसिन मिळवून देण्यास सांगितले. अक्षयने केरोसिन मिळणे शक्य नसल्याचे सांगून डिझेलची व्यवस्था होऊ शकत असल्याचे म्हटले. अक्षयने प्रतापनगरच्या पडोळे चौकातील पेट्रोल पंपावरून निकिताला १०० रुपयांचे डिझेल बॉटलमध्ये खरेदी करून दिले. डिझेल दिल्यानंतर निकिताला चौकात सोडल्याचे अक्षयने सांगितले.
पोलीस पडोळे चौक ते घटनास्थळादरम्यान लागलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करीत आहेत. सुराबर्डी परिसरात एका ठिकाणी निकिता एकटीच रस्ता ओलांडताना दिसत आहे. निकिताचे कुटुंबीय तिने आत्महत्या केली असावी यावर विश्वास ठेवत नाहीत. योजनाबद्ध पद्धतीने तिचा खून केल्याची त्यांना शंका आहे.
सर्व बाबींची होणार तपासणी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सीसीटीव्हीची तपासणी तसेच मैत्रिणीशी व्हॉट्सॲप चॅटिंगवरून निकिताने आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. त्यानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. पोलीस घटनेच्या सर्व बाबींचा तपास करीत आहेत. निकिता घटनास्थळी कशी पोहोचली, कोणत्या परिस्थितीत तिने आत्महत्या केली, याचाही तपास करण्यात येत आहे.